अहमदनगर - काकडी-शिर्डी विमानतळाच्या विविध समस्या व विकासकामांबाबत मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात बैठक पार पडली. या बैठकीसाठी उपस्थित असलेल्या आमदार आशुतोष काळे यांनी काकडी-शिर्डी विमानतळाच्या विविध समस्यांकडे उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. यावेळी अजित पवार यांनी शिर्डी विमानतळासाठी 300 कोटी रुपये उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही दिली.
आमदा आशुतोष काळेंनी मांडल्या समस्या -
यामध्ये शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळारून कार्गो सेवा सुरू करण्यासाठी बी.सी.ए.सी. यांच्याकडे प्रस्ताव दाखल केले आहे. त्यास शासनाने शिफारस देवून सल्लागार समिती नेमून प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून घ्यावा. कार्गोसेवा व विमानतळ विस्तारीकरणासाठी विमानतळाशेजारील जमीन नवीन भूसंपादन कायद्यानुसार संपादन करून शेतकऱ्यांना त्या जमिनीचा योग्य मोबदला द्यावा. देशविदेशातून शिर्डी विमानतळावर येणाऱ्या भाविकांची मोठी संख्या लक्षात घेवून रात्रीची उड्डाणे सुरू करावीत. रन-वे वरील पाणी नैसर्गिक उताराप्रमाणे काकडी येथील पाझर तलावात सोडण्यासाठी निधी मिळावा. विमानतळाच्या बाहेरील बाजूने सर्विलन्स रोड तयार करण्यात यावे. शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाचा IATA कोड सध्या SAG आहे त्यात बदल करून साई करण्यात यावा अशी मागणी यावेळी कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांनी केली आहे.
विमानतळाचे नामांतर -
शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामांतर करण्यात यावे. विमानतळासाठी आलेल्या पाण्यातून काकडी, मनेगाव व रांजणगाव या तीन गावांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे. काकडी गावातील गावठाण अंतर्गत रस्ते व अंतर्गत गटारीचे तसेच दिलेल्या आश्वासनाप्रमाणे उर्वरित विकास कामे लवकरात लवकर पूर्ण करावे. स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना रोजगारांमध्ये प्राधान्य द्यावे. कंत्राटी पद्धतीने कामावर असलेल्या कामगारांना सेवेत कायम करण्यात यावे. काकडी गावातील शेतीसाठी विमान प्राधिकरणाने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे 24 तास वीज देण्यात यावी. विमानतळावरील विविध कामांचे टेंडर स्थानिकांना देण्यात यावे. महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाने 2016-17 पासून थकवलेली मालमत्ता कराची रक्कम तातडीने भरण्यात यावी अशा अनेक महत्वाच्या रखडलेल्या समस्यां कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापुढे मांडल्या.
देशविदेशातून येणाऱ्या साई भक्तांच्या दृष्टीने विमानतळ परिसरातील गावांचा विकास होण्यासाठी आवश्यक असणारी सुधारीत विकासकामे व्हावीत यासाठी शिर्डी विमानतळासाठी 300 कोटी रुपये उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली असल्याची माहिती शिर्डी विमानतळाचे संचालक दीपक शास्त्री यांनी दिली आहे.