अहमदनगर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील शिव भोजन थाळीचा शुभारंभ जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. पालकमंत्री मुश्रीफ आणि जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी ग्राहकांना शिवभोजन थाळी वाढली. त्यानंतर मुश्रीफांनी स्वत: या थाळीची चव चाखली.
सरकारने खूप चांगल्या हेतूने गरीब आणि गरजू जनतेसाठी ही योजना सुरू केली आहे. जास्तीत जास्त गरजू लोकांनी तिचा लाभ घ्यावा असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.
हेही वाचा - प्रजासत्ताक दिन विशेष : येथे महात्मा गांधींच्या नावाने भरते यात्रा, यंदा ६७ वे वर्ष
त्यापूर्वी ७१ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त अहमदनगरच्या पोलीस परेड मैदानावर पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर पालकमंत्र्यांनी पोलीस, गृहरक्षक दल, अग्निशमन दल, एनसीसीच्या पथकांनी दिलेली मानवंदना स्वीकारली. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेले आदर्शगावचे सरपंच पोपटराव पवार, बीजमाता राहीबाई पोपेरे, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले हे उपस्थित होते.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला नगर जिल्ह्यातील आदर्शगाव हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार आणि आदिवासी दुर्गम भागात दुर्मीळ होत चाललेल्या बीजांचे जतन-संवर्धन करणाऱ्या बीजमाता राहीबाई पोपेरे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. दोघेही प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमाला उपस्थित होते. पालकमंत्री मुश्रीफ यांनी त्यांचा सन्मान केला.