अहमदनगर - जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज येथे आंतरजातीय विवाह केल्याने मुलगी आणि जावयाला पेट्रोल ओतून पेटवून दिल्याच्या सैराट प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात या प्रकरणात जखमी झालेला मंगेश रणसिंग यानेच पत्नी रुख्मिणीच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिल्याचे मृत रुख्मिणीच्या सहा वर्षीय लहान भावाने म्हटले आहे. त्यामुळे हा प्रकार सैराट नसून पतीनेच पत्नीला जाळून मारल्याचा संशय आल्याने पोलीस त्या दृष्टीने तपास करत आहेत.
असा घडला होता प्रकार -
सोमवारी सकाळी निघोजमध्ये आंतरजातीय विवाह केल्याने मुलगी आणि जावयास पेट्रोल ओतून जाळल्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणानंतर केवळ जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेवून तपास वेगाने सुरू केला आहे. या घटनेनंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक सागर पाटील, उपाधीक्षक मनिष कलवानीया, पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार, उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. यावेळी घटनेनंतर घराचा दरवाजा तोडणाऱ्या व्यक्तींकडे आणि रुख्मिणीच्या लहान भावंडांकडे कसून चौकशी करण्यात आली.
काय आहे नेमके सत्य ?
या चौकशीतून अनेक धक्कादायक गोष्टी पुढे आल्या. त्यानंतर हे सैराट प्रकरण नसून मंगेशनेच रूख्मिणीला पेटवून मारल्याचा संशय आहे. स्थानिक नागरीकांच्या म्हणण्यानुसार सहा महिन्यांपूर्वी मंगेश आणि रुख्मिणीने आंतरजातीय प्रेमविवाह केला. या विवाहाला दोघांच्याही कुटूंबांचा विरोध नव्हता. मात्र लग्नानंतर काही दिवसांतच गुन्हेगारी प्रवत्तीच्या मंगेशने रुख्मिणीला त्रास देण्यास सुरुवात केली. किरकोळ कारणावरून तो तिला बेदम मारहाण करीत असे. घटनेच्या आधी सलग ३ दिवस मंगेशने रुख्मिणीला मारहाण केली होती. मारहाणीला कंटाळून रुख्मिणी गावातील आपल्या माहेरी निघून आली अशी चर्चा गावात आहे.
रुख्मिणी माहेरी आली असली तरी मंगेश कधीही येवून त्रास देईल ही भिती होती. या भितीने रुख्मिणीची आई मोलमजुरीला जाताना रुख्मिणी व तिच्या लहान भावंडाना घरात ठेऊन दाराला बाहेरुन कुलुप लावून जात असे. घटना घडली त्या दिवशीही घरात रुख्मिणीसह तिची लहान भावंडे निन्चू (वय 6), करिश्मा (वय 5) विवेक (वय 3) घरातच होते. आई घराला बाहेरुन कुलुप लावून मोलमजुरीसाठी निघून गेली. वडिलही सकाळीच मजुरीसाठी बाहेर पडले होते. रुख्मिणी रहात असलेले घर जुन्या बांधणीचे आणि लाकडी खांडांचे आहे. घराच्या माळवदाचे एक खांड पडलेले होते. १ मे ला मंगेशने घराच्या मागच्या बाजूने पडलेल्या भागातून घरात प्रवेश केल्याचे रुख्मिणीच्या भावाने सांगितले आहे.
मंगेशने घरी येताना सोबत एका बाटलीत पेट्रोल आणले होते. त्याने हे पेट्रोल रुख्मिणीच्या अंगावर ओतून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. यावेळी पेट घेतल्यावर तिने मंगेशला मिठी मारली, असे रुख्मिणीचा लहान भाऊ निन्चूने पोलिसांना सांगितले आहे. पोलिसांनीही निन्चूचा जबाब नोंदवला आहे. दरम्यान आरडाओरडा आणि घरातून येणारे धुराचे लोट पाहून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दरवाजाला कुलूप असल्याने टिकावाच्या सहाय्याने दरवाजा तोडण्यात आला. गंभीर भाजलेल्या अवस्थेतील रुख्मिणी स्वत: घराबाहेर आली. पाठोपाठ मंगेशही आला. तोपर्यंत रुग्णवाहिका आली आणि रुग्णवाहिकेतून रुख्मिणी अन् मंगेशला सुरुवातीला नगर येथील जिल्हा रुग्णालयात आणि नंतर पुढील उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात हलवण्यात आले. पुणे येथे उपचारादरम्यान रुख्मिणीचा मत्यू झाला.
पोलिसांनी मंगेशच्या फिर्यादीनुसार ऑनर किलिंगचा गुन्हा दाखल केला असला तरी भरतीया आणि रणसिंग ही दोन्ही कुटुंब परराज्यातून मोलमजुरीसाठी निघोज येथे आले आहेत. अशा परिस्थितीत प्रतिष्ठेचा विचार करण्यासाठी त्याच्याकडे वेळ होता का आणि अशा परिस्थितीत हा प्रकार होण्याची शक्यता आहे का? याबाबत पोलीस तपास करत आहेत. मंगेशने हा बनाव केला का? याबाबत पारनेर पोलीस पुढील तपास करत आहेत. तपासात आणखी काही घटना पुढे येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.