अहमदनगर Ahmednagar Railway Fire : अहमदनगर जिल्ह्यात रेल्वेला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ८ डब्यांच्या आष्टी रेल्वेला अहमदनगर आणि नारायणपूर स्थानकांदरम्यान दुपारी ३ वाजताच्या सुमारास आग लागली. रेल्वेच्या ५ डब्यांना ही आग लागली होती. आग लागली तेव्हा सर्व प्रवासी ट्रेनमधून उतरले होते. त्यामुळे कोणतीही दुखापत किंवा मृत्यू झाल्याचं वृत्त नाही. जळत्या डब्यांच्या आत कोणताही प्रवासी अडकलेला नव्हता.
घटनेची चौकशी होणार : अहमदनगरमधील शिराडोह परिसरात ही घटना घडली. आग लागल्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी अग्निशमन दलाला लगेच घटनास्थळी पाचारण केलं. त्यानंतर ४.१० वाजताच्या सुमारास सर्व ५ डब्यांना लागलेली आग विझवण्यात आली. ही भाषण आग नेमकी कशामुळे लागली होती हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र या आगीत रेल्वेचं मोठं नुकसान झालंय. या घटनेनंतर आता ही आग कशामुळे लागली होती याची चौकशी करण्यात येणार आहे. या घटनेनंतर अहमदनगर-आष्टी रेल्वे सेवा पुढील आदेशापर्यंत रद्द करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनानं याची माहिती दिली.
ट्रेन लेट धावत होती : अहमदनगर-आष्टी रेल्वेसेवा २३ सप्टेंबर २०२२ पासून सुरू झाली आहे. सकाळी ७.४५ वाजता ही ट्रेन अहमदनगरहून निघते आणि १०.१५ वाजता आष्टीला पोहचते. त्यानंतर ११ वाजता तिचा परतीचा प्रवास सुरू होतो. मात्र आज ही ट्रेन अहमदनगरहून निघतानाच सुमारे ३ तास लेट झाली. आष्टीहून परतीच्या प्रवासात तिला दुपारी ३ वाजताच्या सुमारास नारायण डोहच्या पुढे आग लागली. यानंतर एकच खळबळ उडाली. मात्र रेल्वे अधिकाऱ्यांनी वेळीच हालचाल केल्यानं ही आग आटोक्यात आली. महापालिका कर्मचाऱ्यांनी परिसरातील नागरिकांच्या मदतीनं आग विझवली. या घटनेत कोणीही मृत किंवा जखमी झालं नाही.
हेही वाचा :