अहमदनगर- या वर्षीपासून हजयात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंच्या मदतीसाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात हज समिती स्थापन करण्याचा निर्णय हज राज्य कमिटी ने घेतला आहे. सोबतच राज्य शासनाच्या मान्यतेने हजमित्रांची नियुक्ती केली जाणार आहे. ते यात्रेला जाणाऱ्या हाजींना सर्वंप्रकारची मदत करतील, अशी माहिती राज्य हज कमिटीचे नवीन नियुक्त झालेले अध्यक्ष जमाल सिद्दिकी यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य हज कमिटीची बैठक शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्राचे नवीन नियुक्त झालेले अध्यक्ष जमाल सिद्दिकी यांनी या बैठकीमध्ये अहमदनगरमधून जाणाऱ्या हज यात्रींना मार्गदर्शन केले. यावर्षीपासून हज यात्रेली जाणाऱ्यांना त्या-त्या जिल्ह्याच्या मुख्यालयातून एकत्रित करून त्यांना एका खासगी बसमधून मुंबई विमानतळावर घेऊन जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हास्तरावर हज समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. येणाऱ्या आठ-दहा दिवसांत जिल्हा हज समिती स्थापन होणार आहे. सोबतच राज्य शासनाच्या मान्यतेने हजमित्रांची नियुक्ती होणार असून ते यात्रेला जाणाऱ्या हाजींना सर्वंप्रकारची मदत करतील.
खासगी कंपन्यामार्फत हज यात्रेकरूंची लूटमार होत आहे. पूर्वीच्या सरकारने खासगी ट्रॅव्हल्सला तीस टक्के कोटा ठेवला आहे. तो कमी करून केवळ दहा टक्के ठेवावा आणि उर्वरित नव्वद टक्के कोटा सरकारकडे असावा. यामुळे खासगी ट्रॅव्हल्स कडून होणारी लूटमार थांबेल, असे सांगत सिद्दीकी यांनी त्याबाबत शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे स्पष्ट केले. बैठकीस हाजी एजाज देशमुख, इमरान मुजावर सलीम बागवान, इमरान जहागीरदार अली सय्यद सालार भाई अधिक मान्यवर उपस्थित होते.