अहमदनगर - 2021 हे वर्षे जिल्ह्यासाठी विविध कारणांनी राज्यात चर्चेत राहिले. यात मोहटादेवी मंदिर सोने अंधश्रध्दा, रेखा जरे हत्या प्रकरणात पत्रकार बाळ बोठेला हैद्राबाद मधून अटक, जिल्हा रुग्णालयाला लागलेली आग, नगर अर्बन बँकेची निवडणूक, करुणा धनंजय मुंडे यांनी अहमदनगरमधून नियोजित पक्षाची घोषणा आदी घटनांनी अहमदनगर जिल्हा राज्यात चर्चेत राहिला.
- मोहटादेवी सोने प्रकरण : जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यात असलेल्या आणि मराठवाड्याच्या सीमारेषेवर असलेल्या मोहटा देवी गड येथील देवी मंदिराच्या जिर्णोद्धाराच्या निमित्ताने मंदिरात सोने पुरले गेले. हा एक प्रकारे अंधश्रद्धेचा विषय होता. ही बाब पुढे आल्यानंतर एकूणच हे प्रकरण चर्चेत आले. मुख्य म्हणजे, मोहटादेवी ट्रस्टचे अध्यक्ष हे जिल्हा न्यायाधीश असतात. जिल्हा न्यायाधीश ट्रस्टच्या अध्यक्षपदी असताना सोने पुरण्याचा आणि त्यासाठी मोठी दक्षिणा देण्याचे प्रकरण पुढे आले. या संदर्भात सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते, अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेत केलेल्या याचिकामुळे अखेर पोलिसांना तत्कालीन जिल्हा न्यायाधीश यांचासह विश्वस्त मंडळातील अनेक लोकांवर गुन्हे दाखल करावे लागले. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
- रेखा जरे हत्या आणि आरोपी पत्रकार बाळ बोठे : जिल्ह्यात सामाजिक कार्यात कार्यरत असलेल्या आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी असलेल्या रेखा जरे यांची हत्या 2020 वर्ष अखेरीस झाली. हत्या कोणी केली, कोणत्या कारणासाठी केली, याबद्दल मोठा उहापोह झाला. एकूणच पोलीस तपासात अहमदनगरमधील एका नामांकित वृत्तपत्राचा निवासी संपादक असलेला बाळ जगन्नाथ बोठे हा यामध्ये मुख्य सूत्रधार असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्याने पूर्व नियोजित पद्धतीने कट करून अनेक लोकांचा वापर करत रेखा जरे यांची हत्या घडवण्याचा प्रयत्न केला, आणि अखेर रेखा जरे पुण्यावरून अहमदनगरकडे परतत असताना त्यांचा जातेगाव घाटामध्ये दोन आरोपींनी त्यांची हत्या केली. या प्रकरणात बाळ बोठे हा पोलिसांना सापडत नव्हता. जवळपास शंभर दिवसानंतर त्याला या वर्षी हैदराबादमधून अटक करण्यात आली. रेखा जरे यांची हत्या आणि त्याला जोडला गेलेला बाळ बोठे याचा संबंध हा केवळ जिल्ह्यात नव्हे तर, राज्यांमध्ये मोठा चर्चेचा विषय झाला.
- जिल्हा रुग्णालयात आग, तेरा जणांचा मृत्यू : दिवाळीचा सण सुरू असताना या वर्षी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील कोरोना रुग्णांच्या आयसीयू कक्षाला आग लागली. त्यावेळी या ठिकाणी जे रुग्ण होते त्यातील अकरा रुग्ण जागेवर दगावले. त्यानंतर दोन रुग्णांचा मृत्यू उपचार सुरू असतानाच झाला. एकूण सतरापैकी तेरा रुग्ण यामध्ये दगावले. चार रुग्णांवर उपचार सुरू असून एकंदरीत या प्रकरणानंतर पोलीस, जिल्हा प्रशासन यांसह राज्यातील अनेक मंत्र्यांनी जिल्ह्याला भेटी दिल्या. यामध्ये राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही भेट देत दोषींवर कारवाई केली जाईल, असे सांगितले. पोलिसांनी यामध्ये प्राथमिक तपासात सीसीटीव्हीच्या आधारे रुग्णालयातील दोन डॉक्टर आणि तीन कर्मचाऱ्यांवर निष्काळजीपणाचा आरोप ठेवत त्यांना अटक केली. दुसरीकडे राज्य सरकारने नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीचा अहवाल शासन दरबारी पोहचला असला तरी, तो आजही प्रलंबित आहे. या अहवालामध्ये कोणाला दोषी धरले आहे का? याबद्दल आज कुणीही काहीही सांगत नाही. एकूणच या घटनेतील मृत्यूंना जबादार कोण? याची माहिती राज्याला अपेक्षित आहे.
- नगर अर्बन बँक आणि स्व. दिलीप गांधी : जवळपास शंभर वर्षांपेक्षा जास्तीची परंपरा असलेली अहमदनगर शहर आणि जिल्ह्यातील नगर अर्बन बँक ही केवळ जिल्ह्यातच नव्हे तर, राज्यात अनेक जिल्ह्यांत या बँकेच्या शाखा असून गुजरातमध्येही काही शाखा आहे. जवळपास चौदाशे कोटींपेक्षा जास्त ठेवी असलेल्या बँकेकडे आजमितीला सातशे कोटींच्या ठेवी आहेत, अशी माहिती आहे. मधल्या काळामध्ये या बँकेवर स्वर्गीय माजी केंद्रीय राज्यमंत्री दिलीप गांधी यांची सत्ता होती. आणि याच काळात बँकेच्या कारभारावर मोठी टीका आणि अनियमिततेवर आरोप झाले. विरोधकांनी टीका केली आणि चौकशीची मागणी केली. यातून रिझर्व बँक ऑफ इंडियाने प्रशासक नेमला आणि तत्कालीन अध्यक्ष स्व. दिलीप गांधी यांच्या अध्यक्षतेखाली असलेले संचालक मंडळ बरखास्त केले. त्या दरम्यान बँकेवर अनेक आरोप झाल्याने पिंपरी चिंचवड येथे संचालकांवर गुन्हे दाखल झाले. शेवगावमध्ये बनावट सोने तारण प्रकरण राज्यात गाजले. एकूणच या परिस्थितीमध्ये अनेक ठेविदारांनी आपल्या ठेवी काढून घेतल्या. चौदाशे कोटींची ठेवी असलेली ही बँक 700 कोटींवर आली, असा आरोप आहे. माजी संचालक किंवा सभासदांनी विनंती केल्याने आरबीआयने या बँकेची निवडणूक घोषित केली. मात्र, ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी विरोधी असलेले राजेंद्र गांधी यांनी यासाठी प्रयत्न केले. मात्र, दोन्ही बाजूने अर्ज दाखल झाल्यानंतर राजेंद्र गांधी गटांनी आपले सर्व उमेदवारी अर्ज मागे घेतले. काही अपक्ष निवडणुकीत होते, त्यामुळे ही निवडणूक झाली आणि त्यामध्ये स्वर्गीय दिलीप गांधीप्रणीत आणि त्यांचे पुत्र सुवेंद्र गांधी यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनलने सर्व जागा जिंकत बँकेवर पुन्हा एकदा सत्ता स्थापित केले. मात्र, काही दिवसांतच आरबीआयने या बँकेवर निर्बंध लादले असून केवळ दहा हजार रुपये पैसे काढण्यास ठेवीदार आणि बँक खातेदारांना परवानगी दिलेली आहे. त्याचबरोबर, इतर कोणतेही कर्ज त्याचबरोबर मनी ट्रान्सफर याबाबत आरबीआयच्या परवानगीशिवाय कोणतेही व्यवहार करण्यात येण्यास बंदी घातलेली आहे.
- आमदार रोहित पवारांची स्वराज्य ध्वज यात्रा : आमदार रोहित पवार यांची राज्य आणि देशभरातील अनेक ऐतिहासिक ठिकाणी स्वराज्य भगवा ध्वज यात्रा चर्चेत राहिली. मराठ्यांची शेवटची विजयी लढाई ज्या अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा किल्ल्यात झाली त्या ठिकाणी 120 मीटर उंच असा भगवा ध्वज सोहळा पार पडला.
- दुसऱ्या लाटेत कोरोनाचा हाहाकार : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत हाहाकार उडाला. अनेकांचे बळी या कोरोनाने घेतले. शवावर अंत्यसंस्कार करायला स्मशानभूमीत जागा उरली नाही. याचे प्रातिनिधिक व्हिडिओ अहमदनगरमधून व्हायरल झाले आणि चर्चेत आले आणि एकूणच कोरोनात मृत्यूचे प्रमाण किती भयावह आहे, हे विदारक चित्र समोर आले.
- आदर्श सरपंच पोपटराव झाले पद्मश्री : आदर्शग्राम हिवरेबाजारचे आदर्श सरपंच पोपटराव पवार राज्याला परिचित आहेत. त्यांच्या ग्रामविकासावरील कामाची दखल घेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब मानली जाते. अकोल्याच्या बीजमाता राहीबाई पोपरे यांनाही त्यांच्या बीज बँकेबद्दल पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
- आमदार लंकेंचे कोविड सेंटर राज्यात चर्चेत : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वत्र हाहाकार उडाला. विशेष करून ग्रामीण भागात याचा मोठा प्रादुर्भाव दिसून आला. अशात सर्व रुग्णांना शहरातील शासकीय आणि खासगी रुग्णालयात उपचारासाठी खाटा कमी पडू लागल्या. अशात पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी भाळवणी येथे तब्बल अकराशे खाटांचे शरदचंद्र पवार आरोग्य मंदिर नावाने कोविड सेंटर सुरू केले. आमदार लंके यांनी या कोविड सेंटरमध्ये वैयक्तिक लक्ष देत आपला मुक्काम, जेवण कोविड सेंटरमध्येच हलवले. या ठिकाणी व्हेंटिलेटर, ऑक्सिजन खाटाची सोय, उत्तम जेवण, मांसाहार, अंडी, फळे आणि तज्ज्ञ डॉक्टर यांची मोठी फौज उभी केली. राज्यातील अनेक नेते, मंत्री यांनी या कोविड सेंटरला भेट देत आमदार निलेश लंके यांचे कौतुक केले. यासाठी लंके यांना राज्य आणि आंतराष्ट्रीय पुरस्कार मिळाले.
- शहरातील दोन दिग्गज नेत्यांचे निधन : अहमदनगर शहरात शिवसेनेचे अनिल राठोड यांनी तब्बल 25 वर्षे सत्ता गाजवली. सलग पंचवीस वर्षे ते शहराचे आमदार राहिले. भैय्या नावाने प्रसिद्ध असलेले राठोड आणि त्यांची ओमिनी कार ही शहरात प्रसिद्ध होती. कुणाही सामान्य नागरिकाचा फोन यावा आणि भैय्यांनी तिथे धाव घ्यावी, या मुळे आमदार राठोड शहरात प्रसिद्ध होते. दुर्दैवाने त्यांना कोरोनाची बाधा झाली आणि त्यात त्यांचे निधन झाले. शिवसैनिक असलेले राठोड यांची पावभाजीची गाडी होती. पुढे शाखा, शहर प्रमुख ते शिवसेना आमदार, युती काळात राज्यमंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला. दुसरीकडे नगर दक्षिणेचे भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांचेही कोरोनात दुर्दैवाने निधन झाले. दिल्लीत पक्षाच्या बैठकीला ते गेले असता तिथेच त्यांना कोरोनाची लागण झाली आणि तिथेच उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. दिवंगत गांधी हे तीन वेळेस नगर दक्षिणेचे खासदार राहिले. दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात ते जहाज मंत्री राहिले. तसेच, नगर अर्बन बँकेचे ते अध्यक्ष होते. विद्यमान खासदार असताना 2004 ला दिवंगत फरांदे आणि 2019 ला सुजय विखे यांना भाजपने उमेदवारी देत गांधीना उमेदवारी नाकारली. मात्र, संघाशी एकनिष्ठ असलेल्या गांधींनी पक्षाचा निर्णय मान्य करत काम केले. शहरात वास्तव्य असलेल्या आणि शहराशी नाळ जोडलेल्या या जिल्ह्यातील दोन नेत्यांचा 2021 या एकाच वर्षात निधन झाले. एक मोठे राजकीय पर्व दुर्दैवाने संपल्याची भावना शहरवासीयांना आहे.