अहमदनगर - अहमदनगर जिल्हा सरकारी रुग्णालयामधील कोरोना कक्षास या महिन्यात 6 नोव्हेंबर रोजी आग लागून 11 जणांचा बळी गेला होता (Ahmednagar Hospital Fire ) तर या कक्षातील सहा रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते. त्यामधील एका रुग्णाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
बारावा मृत्यू, चौकशी सुरूच -
लक्ष्मण सावळकर असे मृत झालेल्या बाराव्या रुग्णाचे नाव आहे. सहा नोव्हेंबर रोजी ही घटना घडली होती तर आठ नोव्हेंबर रोजी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जिल्हा रुग्णालयात भेट देऊन या प्रकरणात एक चौकशी समिती नेमल्याची घोषणा केली होती. ही चौकशी समिती आठ दिवसात आपला अहवाल सादर करेल आणि यामध्ये जे दोषी असतील त्यांना आम्ही सोडणार नाही, अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली होती. मात्र आज बारावा बळी गेला दहा दिवस उलटून गेले तरी ही चौकशी चालूच आहे. या प्रकरणी पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत तोफखाना पोलीस ठाण्यात प्रथम अज्ञात लोकांविरोधात गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत एका वैद्यकीय अधिकाऱ्यासह चार परिचारिकांना अटक केली होती. सध्या हे सर्व न्यायालयीन कोठडीत आहेत.
चौकशी सुरू, अहवाल कधी येणार?
नाशिकमध्ये काल (मंगळवार) विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीची बैठक पार पडली. मात्र उपलब्ध माहितीनुसार समिती अजूनही कुठल्याही निष्कर्षापर्यंत आलेली नाही. घटनेशी संबंधित विविध विभागांच्या अधिकाऱ्यांकडून लेखी स्वरूपात माहिती मागवलेली आहे. पण त्यात अजून माहिती चौकशी समितीला हवी आहे. दोन वेळेस माहिती मागावून अजून परिपूर्ण माहिती मिळालेली नाही, असा याचा अर्थ असल्याने संबंधित समितीला परिपूर्ण माहिती कधी देणार आणि समिती त्यावर अभ्यास करून अहवाल आणि निष्कर्ष कधी काढणार हा विषय चर्चेत आला आहे. चौकशी समितीचा अहवाल कधी येणार आणि या घटनेला जबाबदार असलेल्या खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोलीस आणि चौकशी समिती पोहोचणार का, याकडे सर्वांचे आता लक्ष लागले आहे.