शिर्डी (अहमदनगर) - साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी एकाच वेळी मोठी गर्दी करू नये तसेच कोरोनाचे नियम पाळले जावेत यासाठी केवळ ऑनलाइन दर्शन पासेस असणाऱ्या भाविकांचा संस्थानच्या वतीने साईदर्शन दिले जात आहे. मात्र, या योजनेचा काही लोकांनी गैरफायदा घेत भाविकांकडून वाढीव रक्कम घेऊन दर्शन पासेसच शिर्डीत काळाबाजार सुरू केला आहे. भाविकांची पासेस तसेच अन्य बाबतीत फसवणूक करणाऱ्या लोकांना विरोधात आता साई संस्थानच्या वतीने कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली असल्याची माहिती साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली आहे.
शिर्डीत काही लोकांकडुन लुट -
दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे साईबाबांचा दर्शनासाठी शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी होणार आहे. या गर्दीच्या काळात साई दर्शन पासेसचा काळाबाजार करून भाविकांची फसवणूक करणाऱ्या लोकांना विरोधात साई संस्थानच्या वतीने सक्त कारवाई करण्यात येणार असलाचही बानायत यांनी सांगितले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर शिर्डी साईबाबांचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. मात्र, साई दर्शनासाठी जातांना ऑनलाईन दर्शन पास काढणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, अनेक भाविकांना साई दर्शन पासेस ऑनलाईन पद्धतीने काढता येत नाहीत किंवा मिळत नाहीत, अशा भाविकांना पासेस काढण्याच्या नावाखाली शिर्डीत काही लोकांकडुन लुट करण्यात येत आहे.
भाविकांनाकडुन 50 ते 500 रुपयांहुनही अधिकची रक्कम काही पासविक्रेते घेत आहेत. इतकेच नव्हे तर पास वेगळ्या माणसाच्या नावावर काढला जातो आणि दर्शनासाठी दुसराच माणूस जात असल्याचे साई संस्थानच्या लक्षात आले. यानंतर आता साई संस्थानने या पासेस विक्री करणाऱ्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा - प्रभाकर साईल यांच्या वकिलाची एनसीबी अधिकाऱ्यांशी भेट; बोलवल्यास साईल हजर राहणार असल्याचे सांगितले
येणाऱ्या दिवाळीच्या सुट्टीत शिर्डीत होणारी भक्तांची मोठी गर्दी बघता साई संस्थानने ऑनलाईन पासेस बरोबरच ऑफलाईन पासेस देण्याची तयारी सुरू केली आहे. याबाबत शासनाकडुन परवानगीही घेतली जात आहे. मात्र, साई संस्थानने दर्शन पासेसचा काळाबाजार करणाऱ्यांविरोधात सुरू केलेली ही कारवाई महत्त्वाची असुन इतर मार्गानेही भाविकांची लुट करणाऱ्यांचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.