अहमदनगर - कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रूग्णवाहिका, शववाहिका सेवा पुरवठादार यांच्याकडून पुरवल्या जाणाऱ्या सेवांचे दर शासनाने आणि जिल्हाधिकाऱ्यांनी निश्चित केलेले आहेत. असतानाही स्थानिक पातळीवर अतिरिक्त शुल्काची आकारणी केली जात असल्याचा तक्रारी प्राप्त होत आहेत. अशा प्रकारे अतिरिक्त शुल्काची आकारणी केल्यास साथरोग अधिनियमान्वये कारवाई करण्याचा इशारा शिर्डीचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी दिला.
कोविडसारख्या भयानक परिस्थितीमध्ये समाजातील दुर्बल घटक, गरिब तसेच सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक पिळवणूक व कुचंबणा होत आहे. यामुळे शासनाप्रती जनतेमध्ये रोष निर्माण होत आहे. अहमदनगर जिल्ह्याकरीता जिल्हाधिकारी आणि प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने 3 जुलैला पुढील दोन वर्षांच्या कालावधीसाठी रुग्णवाहिकेंचे दर निश्चित केले आहेत.
असे आहेत रुग्णवाहिकांचे दर -
मारुती व्हॅन रुग्णवाहिका 25 किमी अथवा दोन तासांसाठी 700 रुपये भाडे, त्यानंतर प्रतिकिलोमीटर 14 रुपये, टाटा सुमो व मॅटेडोरसदृष्य कंपनीने बांधणी केलेली वाहने 25 किमी अथवा दोन तासांसाठी 840 रुपये भाडे, त्यानंतर प्रतिकिलोमीटर 14 रुपये भाडे, टाटा 407, माझदा आदींच्या साच्यावर बांधणी केलेली वाहने 25 किमी अथवा दोन तासांसाठी 980 रुपये भाडे, त्यानंतर प्रतिकिलोमीटर भाडे 20 रुपये, आयसीयु अथवा वातानुकूलीत वाहने 25 किमी अथवा दोन तासांसाठी 1 हजार 190 रुपये भाडे, त्यानंतर प्रतिकिलोमीटर 24 रुपये.
वरीलप्रमाणे 25 किमी किंवा दोन तासांसाठी रुग्णवाहिका वापरासाठी निश्चित केल्याप्रमाणे भाडे आकारणी करणे आवश्यक आहे. सदर भाडेदरपत्रक सर्व रुग्णवाहिकांच्या आतील व बाहेरील दर्शनी भागावर प्रदर्शित करणे रुग्णवाहिका मालक व चालक याच्यासाठी बंधनकारक आहे. या तरतूदींचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध साथरोग अधिनियम 1897 व आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005मधील तरतुदींनुसार कडक कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे शिर्डीचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी प्रसिध्दीपत्राद्वारे सूचित केले आहे.