अहमदनगर - नाशिक पाठोपाठ आता अहमदनगर जिल्ह्यातही दुध भेसळीविरोधात अन्न व औषध सुरक्षा विभागाने कारवाई केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. अकोले तालुक्यातील जांभळे येथील दुध संकलन करणारा योगेश चव्हाण हा दुधात तेल व पावडर भेसळ करुन दुध संकलन करत असल्याची माहिती अन्न व औषध सुरक्षा विभागाला मिळाली होती. त्यावरून आज विभागाने छापा टाकून तब्बल 15 गोणी पावडर व तेल ड्रमचा साठा जप्त केला आहे. दरम्यान, 1 हजार लिटर भेसळ दुध नष्ट करण्यात आले आहे.
15 गोणी पावडर, तेल ड्रमसह इतर साहित्य सापडले
अहमदनगर येथील अन्न व औषध सुरक्षा अधिकारी राजेश बढे आणि यांच्या पथकाने तसेच अकोले पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, उपनिरीक्षक हांडोरे बी. बी. यांच्या पथकाने अकोले तालुक्यातील जांभळे येथील शिंदेवाडीतील योगेश चव्हाण हा दुधात भेसळ करत असल्याचे खबरीवरुन चव्हाण याच्या घरी आज बुधवार (दि. 22 सप्टेंबर)रोजी छापा टाकला असता, तेथे दुधात भेसळ करण्यासाठीचे 15 गोणी पावडर, तेल ड्रमसह इतर साहित्य सापडले. तेथील 40 लिटर दुधातून सँपल घेतले, तर योगेश चव्हाण चालवत असलेले जांभळे येथील संकलन केंद्रावरही छापा मारून तेथील जवळपास 1 हजार लिटर दुध नष्ट केले आहे.
असा प्रकार लक्षात आला तर पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन
अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी पंचनामा करुन मुद्देमाल ताब्यात घेऊन सँपल तपासणीसाठी घेऊन गेले. या सॅपलचा अहवाल आल्यानंतर अकोले पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. गेल्या वर्षाभरात अहमदनगर जिल्हात 12 ते 13 ठिकाणी दुधात भेसळ कारवाई करण्यात आली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. अशा प्रकारे कुठे दुधात भेसळ करण्यात येत असले, तर नागिरकांनी या संदर्भात अन्न व औषध सुरक्षा अधिकाऱ्यांना तसेच स्थानिक पोलिसांना याची माहिती देण्याचे आहवानही यावेळी अधिकाऱ्यांनी केले आहे.
हेही वाचा - सिन्नरच्या दूध संकलन केंद्रात दुधामध्ये सोयाबीन तेल आणि रंगहीन द्रव्याची भेसळ; पाच जणांवर गुन्हा दाखल