अहमदनगर - श्रीगोंदा येथील दुय्यम कारागृहात अटकेतील आरोपीने लोखंडी भांडे गळ्याभोवती मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना आज पहाटे ४ वाजता घडली. गोट्या बंडू काळे (वय - २४ रा. आखोनी, कर्जत) असे आरोपीचे नाव आहे. कारागृहात कर्तव्यावर हजर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याच्या लक्षात हा प्रकार आला. त्यानंतर त्याला तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
काष्टी येथील दरोड्यात गोट्या बंडू काळे याचा सहभाग असल्याचे निष्पन झाल्याने त्याला नंदूरबार येथून अटक करण्यात आली. आज पहाटे चार वाजताच्या दरम्यान आरोपीने शौचालयात वापरल्या जाणाऱ्या लोखंडी भांड्याच्या सहाय्याने डाव्या हाताची नस कापन्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गळ्याभोवती लोखंडी भांडयाने वार करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न करून तो परत येऊन झोपला. कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी झोपलेल्या आरोपींना उठवले. त्यामध्ये गोट्या काळेचाही समावेश होता. पोलिसांना त्याच्या शर्टला रक्त लागल्याचे दिसताच त्याला विचारपुस करण्यात आली. त्यानंतर त्याला श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार करण्यात आले असून प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.