अहमदनगर - जामखेड तालुक्यातील खर्डाच्या शिकारे वस्ती येथे दत्त देवस्थानचे प्रमुख कुशाबा तुळशीराम शिकारे (वय ५५) यांचा खून करणाऱ्या आरोपीला घटनेनंतर काही तासातच जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. शनिवारी रात्री आरोपीने धारदार शस्त्राने वार करून शिकारे यांचा खून केला आणि फरार झाला होता.
खुनाची ही घटना शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली होती. घटनेची माहिती मिळाताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून श्वान पथकाच्या मदतीने पुढील तपास सुरू केला होता. त्यानंतर काही तासातच आरोपी खुन्याचा शोध लागला. शंकर सोपान शिकरे असे आरोपीचे नाव असून त्याने गुन्हा कबूल केला. आरोपी एका शेतात लपून बसला होता. त्यावेळी श्वान पथकातील रक्षा या श्वानाने सुमारे ३ किलोमीटर अंतरापर्यंतचा माग काढून आरोपीचा शोध घेतला. जुना राग आणि वैमनस्यातून आरोपीने हा खून केला असून घटनेनंतर आरोपीने स्वतःच्या हाताची शीर कापून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला आहे.
आरोपी हा मयत कुशाबा शिकारे यांचा चुलत पुतण्याच आहे. शंकर सोपान शिकारे याने खून केल्यानंतर स्वतःच्या घरी जाऊन नस कापून घेतली आणि शेतात लपून बसला होता. श्वान पथकाच्या मदतीने आरोपीचा ताबडतोब शोध लागला. मृत कुशाबा तुळशीराम शिकारे हे शिकारी वस्ती येथे राहत असून त्यांच्या घराशेजारीच दत्त देवस्थान आहे. ते या देवस्थानचे प्रमुख आहेत. शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास ते मंदिरात असतानाच आरोपीने त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून खून केला होता. याबाबत वस्तीवरील लोकांनी जामखेड पोलिसांना खबर दिली होती. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी कुशाबा शिकारे यांचा मृतदेह जामखेड येथे शवविच्छेदनासाठी पाठवला होता. शिकारे यांना पत्नी, दोन मुले, एक मुलगी आहे.