अहमदनगर - जीवनसाथी वेबसाईटवर महिलांच्या नावाने बनावट प्रोफाइल तयार करून फसवणूक करणाऱ्या उच्चशिक्षित एकास सायबर क्राईम विभागाने जेरबंद केले आहे.
१६ नोव्हेंबर २०१८ ते १३ डिसेंबर २०१९ या कालावधीत रेखा निलेश कदम (रा.अकती बिल्डिंग, एचएमसी मार्केट जवळ सेक्टर १९ वाशी, नवी मुंबई) असे नाव सांगणारे अज्ञात व्यक्तीने ऑनलाईन जीवनसाथी या वेबसाईट वरुन संपर्क केला. व्हॉट्सअप मेसेजद्वारे लग्नाचे आमिष दाखवून १ लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक झाली, अशी फिर्याद हनुमान मोहनराव काळे (रा.सारोळा ता.जामखेड) यांनी सायबर क्राईम विभागात दाखल केला होता.
हेही वाचा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा.. राज्यातील शेतकऱ्यांना २ लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी
पोलीस तपासात सदर गुन्ह्यातील आरोपी हा बोरवली पश्चिम, मुंबई येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रायडोगरी, कार्टर रोड, बोरवली पश्चिम मुंबई या ठिकाणी विविध भागात, झोपडपट्टीत आरोपीचा शोध घेतला. यानंतर १८ डिसेंबरला पहाटेच्या सुमारास रायडोगरी, मुंबई परिसरात छापा टाकून पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले. आरोपीला पोलीस खाक्या दाखवताच, गुन्हा केल्याची कबुली दिली. सदर बनावट अकाऊंट वरुन अन्य लोकांची आर्थिक फसवणूक केल्याचे आरोपींने सांगितले. प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील, नगर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण परदेशी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.