अहमदनगर - लग्न आणि प्रेम प्रकरणाला विरोध केला म्हणून मुलीच्या आईला गोळ्या घालून ठार करण्याचा प्रकार मंगळवारी पारनेर तालुक्यातील एका गावात घडला होता. घटनेनंतर आरोपी राहुल साबळे फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मुलीने यापूर्वीही आरोपीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. मात्र, पोलिसांनी प्रकरण गांभीर्याने घेतले नाही म्हणून महिलेला आपला प्राण गमवावा लागला असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे.
पारनेर तालुक्यातील एका गावात पीडित महिला आपल्या दोन मुलींसोबत राहत होती. मोठ्या मुलीवर आरोपी राहुल साबळे हा एकतर्फी प्रेम करत त्रास देत होता. या त्रासाला कंटाळून पीडित कुटुंबाने पारनेर पोलीस स्टेशनमध्ये प्रथम अदखलपात्र गुन्हा दाखल केला. नंतर अॅट्रॉसिटीचा गुन्हाही दाखल केला होता. या प्रकरणाचा राग आल्याने आरोपीने मुलीला बंदुकीचा धाक दाखवून पळून जाऊन लग्न केल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर आईने आपल्या मुलीची सुटका करून पुन्हा पारनेरमध्ये गुन्हा दाखल केला. मात्र, कुठल्याही प्रकारची तक्रारीची दखल पोलिसांनी घेतली नाही, असा आरोप मुलीने केला आहे.
पीडित महिला आणि तिची मुलगी यांच्या तक्रारीची दखल पोलिसांनी वेळेस घेतली असती तर निष्पाप महिलेचे प्राण वाचले असते, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून योग्य ती कारवाई करणार असल्याची माहिती प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी दिली.
या प्रकरणी आरोपी राहुल साबळे आणि दोषी अधिकाऱयांवर योग्य ती कारवाई नाही झाली तर, तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांनी दिला आहे.
अहमदनगर जिल्ह्यात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ दिसत असून अनेक गुन्ह्यात आरोपी गावठी कट्ट्यांचा वापर करताना दिसून येत आहे. जिल्ह्याच्या कायदा सुव्यवस्थेसाठी ही एक मोठी चिंतेची बाब असून जिल्हा पोलिसांनी यावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा -
'केंद्र सरकारकडून राज्य सरकारने गडकिल्ले आपल्या अखत्यारित घ्यावे'