अहमदनगर- आज 'शिक्षक दिन' आहे. या दिवशी शिक्षकांप्रती आदर व्यक्त केला जातो. मात्र, या दिनी मुलांना फक्त ज्ञानाचे धडे न देता, अहमदनगर जिल्ह्यातील आदिवासी बहूल असलेल्या अकोले तालुक्यातील अभिनव, या खाजगी शिक्षण संस्थेने अनोखा उपक्रम राबवला आहे. अभिनव शिक्षन संस्थेने १ ते ५ सप्टेंबर दरम्यान 'शिक्षक आपल्या दारी' हा अभियान राबविला. त्याद्वारे शिक्षकांनी विद्यार्थांच्या पालकांशी भेट घेऊन अनोखा शिक्षक दिन साजरा केला आहे.
कोणतीही शैक्षणिक संस्था आणि पालक यांच्यातील दुवा असणारा महत्वाचा घटक म्हणजे विद्यार्थी. विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांचे परस्पर नातेसंबंध कसे असावेत, हा विषय सामान्यत: गांभीर्याने घेतला जात नाही. खर तर विद्यार्थ्याची नाळ जेवढी आपल्या आई बाबांशी, पालकांशी जोडलेली असते तेवढीच ती शिक्षकांशी देखील असते. कोणत्याही शिक्षकाला विद्यार्थी हा मुलाप्रमाणेच असतो. जेवढा वेळ एक विद्यार्थी पालकांसमवेत घालवतो त्याही पेक्षा जास्त वेळ तो शिक्षकांसमवेत असतो ही वस्तुस्थिती आहे. शिक्षक विद्यार्थ्यामधील कौशल्यांना दिशा देत त्याची कारकिर्द घडवितात. त्यामुळे विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढतो.
शिक्षक आणि पालक यांच्यात सुसंवाद हवाच. याच उद्देशाने अभिनव शिक्षण संस्थेने एक पाउल उचलले. ५ सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. या वर्षी सगळीकडेच शिक्षकांचा सन्मान केला जातो. यावेळी संस्थेच्या सर्व शिक्षकांनी 'शिक्षक आपल्या दारी' ही मोहीम राबवायचीच, असे सकारात्मकतेने ठरविले. या मोहिमेनुसार शिक्षक दिनाचे औचित्य साधून १ ते ५ सप्टेंबर दरम्यान शिक्षक स्वत: पालकांना भेटायला त्यांच्या घरी गेले. त्यांनी पालकांसोबत संवाद साधत मुलांच्या गुनांची माहिती देत पालकांना शाळेकडून काय अपेक्षित आहे, ते जाणून घेतले.