अहमदनगर - टाळेबंदी नंतर आज पहिल्यांदाच शिर्डी साईबाबांना सुवर्ण हार दान म्हणून आला आहे. पुणे येथील साईभक्त श्वेता रांका यांनी तब्बल 200 ग्राम वजनाचा 8 लाख 65 हजार 200 रुपये किंमतीचा सोन्याचा सुवर्ण हार साईबाबांच्या चरणी अर्पण केला. हा हार संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
हेही वाचा - खळ-खट्याक करणाऱ्या मनसैनिकांनी लाडू वाटून केला पेट्रोल दरवाढीचा निषेध
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तब्बल 9 महिने शिर्डी साईबाबांचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद होते. या काळात शिर्डी साईबाबांच्या देणगीवर देखील मोठा परिणाम झाला होता. मात्र, 16 नोव्हेंबर २०२० पासून पुन्हा साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. तेव्हापासून साईंच्या देणगीत पुन्हा हळूहळू वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
भाविकांकडून साई संस्थानला रोख स्वरुपात देण्यात येणाऱ्या देणगीत जरी वाढ होत असली, तरी सोने आणि चांदीच्या देणगीवर मोठा परिणाम झालेला आहे. आज तब्बल 12 महिन्यांनी साईबाबांना सोन्याची मोठी भेट वस्तू देणगी स्वरुपात आल्याने येणाऱ्या काळात पुन्हा साईबाबांना नेहमीसारखे सोने आणि चांदीच्या वस्तू भाविकांकडून येण्यास सुरुवात होईल, असे आजच्या देणगीवरून म्हणावे लागले.
हेही वाचा - अहिल्यादेवी वक्तव्य प्रकरण : 'हे' 2 आमदार खंबीरपणे शरद पवारांच्या पाठीशी