अहमदनगर - शहरातील वैदूवाडी भागात रिक्षामधून घेऊन जाणारी सुमारे ८४ लाख रुपयांची रक्कम आचारसंहिता पथक आणि पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत पकडण्यात आली. नगर शहरातील सावेडी नाका मार्गे वैदूवाडी विभागातील एका फायनान्स कार्यालयात ही रक्कम नेली जात होती.
एका रिक्षामधून गोणीत भरून रोकड नेण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी रिक्षाचा पाठलाग करत या फायनान्स कंपनीच्या कार्यालयात पोहोचले आणि रक्कम हस्तगत केली. यावेळी रिक्षाचालक फरार झाला. दरम्यान, काही लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे पैसे कोठून आले याबाबत माहिती मिळविण्याचे काम रात्री सुरू आहे. रक्कम किती आहे याची मोजदाद सुरू असल्याचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी सांगितले. ही कारवाई केल्यानंतर घटनास्थळी आचारसंहिता पथक, पोलीस आणि आयकर विभाग कारवाई करत आहे.