अहमदनगर - नाताळ आणि नवीन वर्षाच्या 11 दिवसांच्या सुट्ट्यांमध्ये साईमंदिरात 8 लाख 23 हजार भाविकांनी समाधीचे दर्शन घेतले आहे. या काळात 16 कोटी 93 लाख 37 रुपयांचे रोख दान दक्षिणा पेटीत जमा झाले आहे. तसेच 48 लाख 11 हजार किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने देखील दान स्वरुपात मिळाले आहेत.
नाताळ व नववर्षाच्या सुरुवातीचे औचित्य साधून अनेक भक्त शिर्डीत दर्शनासाठी हजेरी लावत असतात.
यंदा 23 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान मंदिरात 8 लाख 23 हजार भाविकांनी बायोमॅट्रीक आणि सशुल्क पासेस द्वारे दर्शन घेतल्याची नोंद आहे. याच अकरा दिवसात साईमंदिर परिसरातील दानपेटीत 9 कोटी 54 लाख 99 हजार 670 रुपयांची विक्रमी देणगी जमा झाली आहे. तर साई मंदिर परिसरातील देणगी काऊंटरवर 3 कोटी 46 लाख 93 हजार जमा झाले आहेत.
प्रत्यक्ष दर्शनाला येऊ न शकलेल्या भाविकांनी ऑनलाईन 73 लाख 29 हजार तसेच डेबीट, क्रेडीट कार्ड द्वारे 1 कोटी 38 लाख 27 हजार,चेक, डीडी 1 कोटी 50 लाख 86 हजार रुपयांचे दान दिले आहेत.
साईबाबा संस्थानकडे सध्या 20281 कोटींच्या ठेवी तर 455 किलो सोने आणि 5 हजार 553 किलो चांदी असून तब्बल 10 कोटींचे हिरे आहेत.