अहमदनगर - शुक्रवारी दिवसभरात जिल्ह्यात कोरोनाचे सात रूग्ण आढळून आले. संगमनेर शहरातील एक महिला आणि धांदरफळ येथील चार जण असे पाच जण कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर अवघ्या काही तासातच उर्वरित ५ पैकी २ व्यक्तींचा अहवाल प्राप्त झाला. या दोन्ही व्यक्ती बाधित असल्याचे स्पष्ट झाले.
आलेल्या अहवालानुसार बाधित व्यक्तीमध्ये २८ वर्षीय महिला आणि ५ वर्षीय मुलाचा समावेश आहे. हे दोन्ही कोरोनाबाधित धांदरफळ येथील आहेत. यामुळे आता जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 51 झाली आहे. या दोन्ही व्यक्ती मृत्यू झालेल्या रुग्णाच्या नातेवाईक आहेत.
संगमनेर शहरातील काही भाग आणि धांदरफळ बुद्रुक २२ मे पर्यंत हॉटस्पॉट क्षेत्र घोषित-
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी संगमनेर शहरातील ईस्लामपुरा, कुरण रोड, बीलाल नगर, अपना नगर, पानसरे आखाडा, गुंजाळ आखाडा, पुनर्वसन कॉलनी, पावबाकी रस्ता, ज्ञानमाता विद्यालय परिसर, तसेच कुरण (संगमनेर तालुका) व मौजे धांदरफळ बु. (संगमनेर तालुका) ही ठिकाणं हॉटस्पॉट म्हणून घोषित केली आहेत. या परिसरांतील सर्व दुकाने, अत्यावश्यक सेवा, वस्तू विक्री इत्यादी शनिवारी ९ मे पासून ते २२ मे पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, जामखेड येथील दोन कोरोनाबाधित व्यक्तींचा १४ दिवसानंतर निगेटिव्ह आला आहे. दुसरा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे.