अहमदनगर - नेवासा तालुक्यातील गोधेगाव येथे विषारी गवताच्या मुळ्या खाल्ल्याने ४६ शेळ्या व मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे मेंढपाळांमध्ये भीती पसरली आहे. दुष्काळामुळे चाऱ्या अभावी मेंढपाळांनी मेंढ्यांना प्रवरा नदीपात्रात उगवलेल्या गवतावर चरण्यासाठी सोडले होते.
गवत खाल्ल्यानंतर एक-एक करत अनेक मेंढ्यांनी माना टाकल्या. अनेक मेंढ्यांच्या तोंडातून फेस येत होता. यात मंगळवारी २० मेंढ्या आणि ५ शेळ्या दगावल्या. त्यामुळे मेंढपाळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनास्थळी पाहणी करण्यासाठी बुधवारी दुपारी नगरहून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक आले होते. आज बुधवारी आणखी २१ मेंढ्या दगावल्याने मृत मेंढ्यांची संख्या ४१ तर शेळ्यांची संख्या ५ वर गेली आहे. या घटनेत मेंढपाळांचे अंदाजे ४ लाखांचे नुकसान झाले आहे.
दुष्काळामुळे सगळीकडे चाऱ्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. त्यामुळे मेंढपाळ थोडाफार चारा मिळण्याच्या आशेने मेंढ्या नदीपात्रात घेवून जात आहेत. मात्र, विषारी गवत खाऊन त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.