अहमदनगर - तालुक्यातील धनगरवाडी आणि भिंगार या ठिकाणी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चार जणांनी विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. धनगरवाडीमध्ये आई व मुलीने तर, भिंगार येथे पती-पत्नीने आत्महत्या केली आहे.
धनगरवाडी येथे निता उर्फ कविता सचिन कापडे (वय- 27 रा. धनगरवाडी ता. नगर) व मुलगी प्रणाली कापडे (वय- 4) यांनी विहिरीत उडी घेऊ जीवन संपवले. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संबंधित आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट असून, पुढील तपास पोलीस हवालदार दीपक गांगुर्डे करत आहेत.
घटनाक्रम (धनगरवाडी)
गुरुवारी (दि.28नोव्हेंवर)ला रात्री निता कापडे व मुलगी प्रणाली या दोघीही घराला कडी लावून बाहेर पडल्या. सकाळी कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शोधाशोध केली. यानंतर घराजवळ असणाऱ्या एका विहिरीत दोघींचे मृतदेह आढळून आले. ग्रामस्थांच्या मदतीने हे मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनाक्रम (भिंगार)
भिंगारमध्ये पती-पत्नीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज (दि.29नोव्हेंबर)ला उघडकीस आली आहे. संबंधित प्रकार भिंगार येथे बुऱ्हाणनगर रस्त्यावरील लष्करी हद्दीत असलेल्या एका शेतात घडला आहे. बादल हरिश्चंद्र वाल्मिकी (वय-26), बबली वाल्मिकी (वय -19) असे मृत जोडप्याचे नाव आहे. दोघेही भिंगार परिसरातील इंद्रानगर येथील रहिवासी आहेत. शुक्रवारी सकाळी विहिरीतून दुर्गंध येत असल्याने स्थानिक सुरक्षा रक्षकाने विहिरीत पाहिले. यानंतर संबंधित घटनेची उकल झाली.