अहमदनगर - भारतीय लष्कराची महत्त्वाची प्रशिक्षण संस्था असलेल्या अहमदनगर येथील मेकॅनाइज्ड इंन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटरमधील (एमआयआरसी) २९३ जवान आज सैन्यात दाखल झाले. त्यांनी ३६ आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून देशसेवेची शपथ घेतली.
सैनिकांसाठी बटालियन आणि सेना हीच प्राथमिकता-
प्रत्येक सैनिकासाठी बटालियन, रेजिमेंट आणि सेना हे प्राणापेक्षाही महत्त्वाचे असते. आपल्या पलटनचे नाव आणि ध्वज यांचा त्यांनी आदर केला पाहिजे. नेहमी आपल्या अंगावरील खाकी वर्दी हाच सैनिकाचा धर्म असून व्यक्तिगत धर्मापेक्षा सैनिकाचा धर्म पहिल्यांदा येतो, असे कमांडन्ट मेजर जनरल शैलजानंद झा यांनी सांगितले.
सैनिक हे देशाची आन, बाण आणि शान -
कठीण परिश्रम आणि कठोर मेहनतीच्या आधारे प्रशिक्षण पूर्ण करणारे हे कुशल सैनिक आता ख-या अर्थाने आपल्या सैनिक जीवनाची सुरूवात करत आहेत. प्रशिक्षणादरम्यान सैनिकांना अनेक आव्हाने आणि कठीण परिस्थितीचा सामना करण्याचे देखील प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे हे सैनिक आपल्या देशाच्या आन, बान आणि शान यासाठी प्रसंगी आपल्या प्राणांची आहुती देण्यासही तयार असतात, असेही झा म्हणाले.
शानदार संचलन आणि कौतुकाची थाप -
प्रशिक्षणा दरम्यान उत्कृष्ट कामगिरी करणारे मुकेश रावत हे बेस्ट रिक्रुट ठरले असून त्यांचा 'जनरल सुंदर जी गोल्ड मेडल' देऊन गौरव करण्यात आला. रिक्रुट जॉय बोरा यांचा 'जनरल के. एल. डिसूजा सिल्वर मेडल' आणि रिक्रुट शिव शंकर यांना 'जनरल पंकज जोशी ब्राँझ मेडल' देऊन सन्मानित करण्यात आले. शपथग्रहण सोहळ्याच्या वेळी शानदार संचलन करत जवानांनी उपस्थितांची मने जिंकली.
सर्वधर्मीय धर्मगुरूंनी दिली शपथ -
कमांडन्ट मेजर जनरल शैलजानंद झा यांनी संचलनाची मुख्य सलामी स्वीकारली व संचलनाची पाहणी केली. धर्मगुरुंनी जवानांना कर्तव्यासाठी निष्ठा आणि समर्पणाची शपथ दिली. दिक्षांत परेडनंतर वॉर मेमोरियल येथे मेकॅनाइज्ड रेजिमेंटलमधील हुतात्मा सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पासिंग आउट परेड झाल्यानंतर जवानांना गौरवपदक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.