अहमदनगर - भारतीय लष्करातील महत्त्वाची प्रशिक्षण संस्था असलेल्या अहमदनगर येथील मेकॅनाइज्ड इन्फेन्ट्री रेजिमेंटल सेंटरमधील (एमआयआरसी) 185 जवानांनी 36 आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून शनिवारी (दि.९ नोेव्हेंबर) देशनिष्ठेची शपथ घेतली. २१२व्या या शपथग्रहण सोहळ्याच्या वेळी शानदार संचलन करत देशरक्षणाचा संकल्प जवानांनी केला. यावेळी आपल्या मुलांना सैन्यामध्ये पाठवणाऱ्या पालकांचा गौरवपदक देऊन सन्मान करण्यात आला.
शानदार संचलन करून जवानांनी उपस्थितांची मने जिंकली. लष्कराच्या बँडपथकाने सादर केलेल्या धूनवर जवानांचे आगमन झाले. या सर्वांनी पहिली सलामी कर्नल विनायक शर्मा यांना, दुसरी सलामी कर्नल रसेल डिसुझा यांना तर तिसरी सलामी ब्रिगेडिअर वी.एस. राणा यांना दिली. लेफ्टनंट जनरल इकरूप सिंह घुमन यांनी मुख्य सलामी स्वीकारली तसेच संचलनाची पाहणी केली. त्यानंतर एमआयआरसी संस्थेने लष्करासाठी दिलेल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल त्यांना प्रदान करण्यात आलेला ध्वज आणण्यात आला. सर्वांनी उभे राहून या ध्वजाला सलामी दिली. धर्मगुरुंनी जवानांना कर्तव्यासाठी निष्ठा व समर्पणाची शपथ दिली. संचलनालंतर प्रशिक्षणादरम्यान उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जवानांचा तसेच आपल्या मुलांना लष्करात पाठवणाऱ्या पालकांचा अधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
हेही वाचा - 'प्रदूषणमुक्त' भारतासाठी 11 दिवसांत पनवेल ते कन्याकुमारी सायकल प्रवास
36 आठवड्यांचे प्राथमिक प्रशिक्षण पूर्ण करून सैन्यात दाखल होण्यासाठी सज्ज झालेल्या जवानांना मार्गदर्शन करताना लेप्टनंट जनरल इकरूप सिंह घुमन म्हणाले, "सैनिकr जीवनाला सुरुवात करत असताना तुम्हाला आजूबाजूला अनेक गोष्टी दिसतील. त्यामध्ये जशा चांगल्या गोष्टी असतील, तशा वाईट गोष्टींचाही समावेश असू शकतो. मात्र, त्यामधून तुम्हाला नेमकी कशाची निवड करायची आहे, याची जबाबदारी तुमचीच आहे. आपले सैनिकी जीवन यशस्वी करण्यासाठी, एक उत्कृष्ट सैनिक होण्यासाठी आजच दृढनिश्चय करा" दरम्यान, मारुत मिश्रा हा जवान प्रशिक्षणादरम्यान सर्वोउत्कृष्ट कामगिरी करणारा बेस्ट रिक्रूट ठरला. त्याचा ‘जनरल सुंदरजी गोल्ड मेडल’ देऊन गौरव करण्यात आला. तर, रिक्रूट पिंद्रल राजू व रिक्रूट रोहित कुमार यांना अनुक्रमे ‘जनरल के. एल. डिसूजा सिल्वर मेडल’ व ‘जनरल पंकज जोशी कांस्यपदक’ देऊन सन्मानित करण्यात आले. तर रिक्रूट दिलप्रीतसिंह यांना बेस्ट ड्रिल कॅडेट सन्मान देऊन गौरविण्यात आले.