अहमदनगर : शिर्डी साईबाबा संस्थानमार्फत आयकर अपील दाखल करण्यात आले व आयकर विभागाने अंतीमतः साईबाबा संस्थानला धार्मिक व धर्मदाय ट्रस्ट असल्याचे मान्य करुन दक्षिणापेटीतील दानावर आकारणी करण्यात आलेल्या करात सुट दिली आहे. यामुळे मागील तीन वर्षात आकारणी करण्यात आलेल्या १७५ कोटी रुपये आयकरमध्ये साईबाबा संस्थानला सुट मिळाली ( income tax exemption to Shirdi Saibaba Sansthan ) आहे. अशी माहिती साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली आहे.
धर्मादाय ट्रस्ट गृहीत धरून करात सूट - आयकर विभागाने सन २०१५-१६ चे कर निर्धारण करताना शिर्डी साईबाबा संस्थान हे धार्मिक ट्रस्ट नसुन धर्मादाय ट्रस्ट गृहीत धरुन संस्थानच्या दक्षिणापेटीत आलेल्या दानावरती ३० टक्के आयकर आकारणी करुन १८३ कोटी रुपये कर भरणा करण्याची नोटीस दिली होती. दरम्यान, आयकर विभागाने मागील दोन वर्षाचे दक्षिणा पेटीतील दानावर आयकर आकारणी केली नव्हती. तथापी सदर निर्णयास अनुसरुन मागील दोन वर्षाच्या दक्षिणापेटील दानावर सुध्दा आयकर आकारणीचा निर्णय घेतला व संस्थानला आयकर आकारणीच्या नोटीसा दिल्या. संस्थानमार्फत उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायलयात रिट अर्ज दाखल करण्यात आले होते. उच्च न्यायलय व सर्वोच्च न्यायालयाने आयकर अपीलामध्ये कर निश्चित होईपर्यंत देय करास स्थगिती आदेश दिला होता.
न्यायालयात बाजू मांडली - याकरीता संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत व व्यवस्थापन समितीचे नियोजनाने उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयामध्ये दिल्लीचे वरिष्ठ वकील सीए एस.गणेश यांनी संस्थानची बाजू मांडली. तसेच याकामी आयकर विभागातील निवृत्त प्रिन्सिपल एस.डी.श्रीवास्तव, माजी विश्वस्त अड.मोहन जयकर यांनी मार्गदर्शन केले.