अहमदनगर - जिल्ह्यातील कोठे बुद्रक या गावातील शंभर जणांचा वाढदिवस एकाच दिवशी साजरा झाला. एका रांगेत बसून 81 पुरुष आणि 19 महिलांचे औक्षण करून केक कापत अभुतपूर्व सामूहिक वाढदिवस उत्सव म्हणून येथे साजरा झाला. वैयक्तिक घरात चार - पाच जणांमध्ये वाढदिवस साजरा करण्यापेक्षा शंभर जणांचा एकत्रित वाढदिवस साजरा केल्याने आनंद व्दिगुणित झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.
संगमनेर तालुक्यातील कोठे बुद्रक हे छोटेसे गाव आहे. गावाची लोकसंख्या जेमतेम बाराशे ते चौदाशे. सह्याद्री पर्वत रांगेत वसलेल्या या गावातून मुळा नदी वाहत असल्याने बऱ्यापैकी बागायत आणि सदन शेतकरी येथे राहतात. गावातील सामाजिक मंडळाने पुढाकार घेवून नवीन पंरपरा सुरू केली आहे. एक जून रोजी गावातील ज्यांचे वाढदिवस आहेत त्या सर्वांना एकत्र करून सामूहिक वाढदिवस साजरा करण्याचा अनोखा सोहळा सुरू केला. 1 जून च्या संध्याकाळी नऊच्या सुमारास सर्व वाढदिवस असलेल्या व्यक्तींना एकत्रित केले गेले. त्यांना महाराष्ट्रीयन फेटे बांधून माथ्यावर गंध, अक्षदा टाकत औक्षण केले आणि त्यानंतर एकचा वेळी शंभर केक कापत 'बार बार दिन ये आये' हे हिंदी चित्रपटातील गाणे गात मोठा जल्लोष करण्यात आला.
शंभर केक कापून वृक्षसंवर्धनाचा संकल्प केला गेला. प्रत्येकाने एक वृक्ष लावल्याने एकाच दिवशी शंभर नवीन वृक्ष कोठे बुद्रक गावात रोपली गेली. यावेळी बोलताना बर्थडे बॉय उल्हास वाकळे सांगतात की, आमच्या गावात एकाच वेळी शंभर नागरिकांचा वाढदिवस होणार हे आम्हाला माहीत नव्हते. सोशल मीडियामुळे तसेच तरुण मंडळींनी पुढाकार घेतल्याने याचा उलगडा झाला. घरात केक कापत वाढदिवस साजरा होतो, मात्र आज आपल्याच शेजाऱ्यांसोबत केक कापल्याने याला उत्सवाचे स्वरुप आले असून एक जून हा वाढदिवस दिन म्हणून साजरा केला जावा, असे ते म्हणाले.
1979 च्या आधी जन्म झालेल्या जुन्या पिढीतील अनेक लोकांना आपली जन्मतारीख माहित नव्हती. शिवाय जन्म-मृत्यूच्या तारखेची नोंदणी करण्याबाबत एवढी जागरूकता नव्हती. इतकेच काय तर शाळेत नाव नोंदवताना जन्म तारखेची फारशी आवश्यकता नव्हती. मात्र, शाळेत घालण्यासाठी वयाची अट होती. ही अट पूर्ण करण्याचा कालावधी जूनपासून मोजला जात असे. त्यामुळे, सोयीचे म्हणून बहुतांश शिक्षक विद्यार्थ्यांची जन्मतारीख 1 जून नोंदवत असत. महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच निमशहरी भागातील शाळा या 1 जूनला उघडत. त्या दिवशी जेवढी मुले शाळेत येत. तेवढ्या मुलांचा जन्मदिवस शिक्षक मंडळी 1 जून नोंदवत. काहींचे वडील फिरतीची आणि बदलीची नोकरी करणारे होते. त्या गोंधळात महत्त्वाची कागदपत्रे देखील हरवायची. त्यामुळे, मुलांच्या जन्मतारखेची नोंद असलेली कागदपत्रेही सापडायची नाहीत. पुढे शाळेत किंवा नोकरीच्या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करताना अडचणी यायच्या. त्यामुळे ही मुले कोणत्याही महिन्यात जन्मलेली असली तरी सबळ पुरावा नसल्याने त्यांची जन्मतारीख 1 जूनच केली जायची. त्यामुळे अनेकांचा वाढदिवस 1 जूनला येतो, असेही म्हटले जाते.
हेही वाचा - 'एक विवाह ऐसा भी'; अनाथ आश्रमातील मुलीने केलं शेतकरी पुत्राशी लग्न