टोकियो - भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला. तिने या स्पर्धेत कांस्य पदक जिंकले. या कामगिरीसह सिंधू सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली. तिने याआधी रिओ ऑलिम्पिक 2016 मध्ये रौप्य पदक जिंकले होते. तर पुरूषांमध्ये हा कारनामा कुस्तीपटू सुशील कुमार याने केला होता. सुशील कुमारने बिजींग ऑलिम्पिक 2008 मध्ये कांस्य तर 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकलं होतं.
सिंधूने अशी केली चिनी खेळाडूवर मात...
पी. व्ही. सिंधूने पहिल्या सेटमध्ये 4-2 अशी आघाडी घेतली. तेव्हा चीनच्या बिंग जिआओ हिने शानदार वापसी केली. तिने 6-6 अशी बरोबरी साधली. त्यानंतर सिंधू 8-6 ने पुढे गेली. पुढे देखील सिंधूची आघाडी कायम राहिली. एकवेळ सिंधू 11-8 ने आघाडीवर होती. त्यानंतर तिने हाच धडाका कायम ठेवत पहिला सेट 23 मिनिटात 21-13 असा जिंकला.
दुसऱ्या सेटमध्ये देखील सिंधू आक्रमक खेळत होती. तिने 5-3 ने आघाडी घेतली. तेव्हा बिंग जिआओ हिने जोरदार पुनरागमन करत सामना 6-8 अशा स्थितीत आणला. बिंग देखील तोडीसतोड खेळ करत होती. तेव्हा सिंधूने बिंगच्या खेळाला चोख प्रत्युत्तर देत सामना 10-8 अशा स्थितीत आणला. या सेटमध्ये दोन्ही खेळाडू एकमेकांना कडवी झुंज देत होते. पण अखेर यात सिंधूने बाजी मारली. सिंधूने हा सेट 21-15 असा जिंकत सामन्यासह कांस्य पदक आपल्या नावे केला.
सलग तिसऱ्या ऑलिम्पिकमध्ये भारताला बॅडमिंटन खेळामध्ये पदक
भारताला सलग तिसऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत बॅडमिंटन खेळामध्ये पदक मिळालं आहे. 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये सायना नेहवालने कांस्य पदक जिंकलं होतं. त्यानंतर रिओ ऑलिम्पिक 2016 मध्ये सिंधूने रौप्य पदक जिंकले होते. ऑलिम्पिक इतिहासात रौप्य पदक जिंकणारी सिंधू पहिली भारतीय महिला आहे. यानंतर आता टोकियो ऑलिम्पिकमध्ये सिंधूने कांस्य पदक जिंकत करियरमध्ये आणखी एक ऑलिम्पिक पदकाची भर घातली.
हेही वाचा - Tokyo Olympics : जय हो! भारताला आणखी एक पदक; पी. व्ही. सिंधू कांस्य पदकाची मानकरी
हेही वाचा - Tokyo Olympics : नोवाक जोकोव्हिचचा संताप; रागाच्या भरात तोडलं रॅकेट, पाहा व्हिडिओ