टोकियो - जर्मनीचा स्टार टेनिसपटू अलेक्झांडर झ्वेरेव याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुरूष एकेरीचे विजेतेपद पटकावले. झ्वेरेवने अंतिम सामन्यात रशियाच्या करेन खाचानोव्ह याचा 6-3, 6-1 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. या विजयासह तो सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला. करेनला रौप्य पदक मिळाले. तर स्पेनच्या पाब्लो बुस्टा याने कांस्य पदक पटकावलं.
24 वर्षीय झ्वेरेवचे हे कारकिर्दीतील सर्वात मोठं यश आहे. जर्मनीचा दिग्गज स्टार बोरिस बेकरला जी किमया साधता आली नाही. ती कामगिरी झ्वेरेवने करून दाखवली. झ्वेरेव ऑलिम्पिकमध्ये पुरूष एकेरीत सुवर्ण पदक जिंकणारा जर्मनीचा पहिला खेळाडू ठरला.
झ्वेरेवने अंतिम सामन्यात रशियाच्या खेळाडूवर निर्विवादीत वर्चस्व राखलं. पहिला सेट त्याने 6-3 असा आरामात जिंकला. परंतु दुसऱ्या सेटमध्ये खाचानोव्हकडून पुनरागमनाची आशा होती. परंतु, जागतिक क्रमवारीत 5 व्या स्थानी असलेल्या झ्वेरेवने या सेटमध्ये देखील आपला दबदबा कायम राखला. त्याने सलग 5 पाईंट जिंकले. तेव्हा खाचानोव्हला एक पाँईंट जिंकला. अखेरीस झ्वेरवने आणखी एक पाँईट जिंकत सेट, सामन्यासह सुवर्ण पदकाला गवसणी घातली.
झ्वेरेवच्या नावे एकही ग्रँडस्लॅम नाही. तो 2020 मध्ये यूएस ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. पण त्याला ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थीमने पराभूत केलं होतं. 2018 मध्ये झ्वेरेव याने एटीपी टूर फायनल जिंकली होती. दरम्यान, एटीपी टूरमध्ये टेनिस क्रमवारीतील अव्वल 8 खेळाडू खेळतात.
हेही वाचा - Tokyo olympic : अविश्वसणीय! सुवर्ण पदक जिंकण्यासाठी शार्लोट वर्थिंग्टनचा 360 डिग्री बॅकफ्लिप
हेही वाचा - Go For Gold! प्रसिद्ध वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायकांनी दिल्या 'लवलिना बोर्गोहेन'ला अनोख्या शुभेच्छा