लंडन - विम्बल्डन स्पर्धेच्या महिला एकेरीत अग्रमानांकित अॅश्ले बार्टी, अँजेलिक केर्बर आणि व्हिनस विल्यम्स यांनी विजयी सलामी दिली. तर २३ वेळची ग्रँडस्लॅम विजेती अमेरिकेची सेरेना विल्यम्सला दुखापतीमुळे पहिल्या फेरीतून रिटायर व्हावे लागले. दुसरीकडे पुरुष एकेरीत चौथा मानांकित अलेक्झांडर झ्वेरेव्ह दुसऱ्या फेरीत पोहचला आहे. तर रॉजर फेडरर प्रतिस्पर्धी एड्रियन मॅनारिनो याने दुखापतीमुळे माघार घेतल्याने दुसरी फेरी गाठली आहे.
अश्ले बार्टीला विम्बल्डनच्या पहिल्या फेरीत विजय मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. स्पेनच्या कार्ला सुआरेझ नवारो हिने बार्टीला चांगलेच झुंजवले. पण अनुभव पणाला लावत बार्टीने सामना ६-१, ६-७ (१/७), ६-१ असा फरकाने जिंकला. २५व्या मानांकित केर्बरने निना स्टोजानोव्हिचचा ६-४, ६-३ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. तर कॅरोलिना प्लिस्कोव्हाने तमारा झिदानसेकला ७-५, ६-४ अशा फरकाने नामोहरम केले.
व्हिनस विल्यम्स रोमानियाच्या मिहाएला बुझारनेस्कू हिचा ७-५, ४-६, ६-३ अशा तीन सेटमध्ये पराभव केला. तर जबेरने स्वीडनच्या रिबेका पीटरसन हिला ६-२, ६-१ असे सहज पराभूत केले. अमेरिकेच्या स्लोएन स्टीफन्स हिने चेक प्रजासत्ताकच्या १०व्या मानांकित आणि दोन वेळा विम्बल्डन विजेत्या पेट्रो क्विटोव्हा हिला ६-३, ६-४ अशी सरळ दोन सेटमध्ये धूळ चारली. सेरेना विल्यम्सचा बेलारुसची अलियाकसांद्रा सासनोविच हिच्याशी सामना झाला. सामना ३-३ अशा बरोबरीत असताना सेरेना कोर्टवर घसरून पडली. यात दुखापत झाल्याने तिने सामना सोडला.
जर्मनीच्या झ्वेरेव्हने नेदरलँड्सच्या टॅलन ग्रिकस्पूरचा ६-३, ६-४, ६-१ असा सहज पराभव केला. प्रतिस्पर्धी मॅनारिनोने सामन्यातून माघारीचा निर्णय घेतल्याने, सहाव्या मानांकित फेडररला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली. मॅनारिनो याने सामना ६-४, ६-७ (३-७), ३-६, ६-२, ०-० (१५/०) अशा स्थितीत असताना माघार घेतली.
हेही वाचा - विम्बल्डनमध्ये एका महिलेवर फोकस झाला कॅमेरा, प्रेक्षकांनी उभे राहून केला टाळ्याचा कडकडाट
हेही वाचा - Wimbledon २०२१ : त्सित्सिपासला बाहेर, मरे सबालेंकाची सलामी