लंडन - विम्बल्डन ओपनच्या पहिल्याच दिवशी धक्कादायक निकाल पाहायला मिळाला. दोन आठवड्यांपूर्वीच फ्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या ग्रीसच्या स्टेफानोस त्सित्सिपासला पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला. इंग्लंडचा खेळाडू अँडी मरे याने पहिल्या फेरीत सहज विजय मिळवत दुसरी फेरीत गाठली. तर बेलारूसची आर्यना सबालेंकाने देखील विजयी सलामी दिली.
पुरुष एकेरीत अमेरिकेच्या बिगर मानांकित फ्रान्सेस टिआफोए याने तिसऱ्या मानांकित त्सित्सिपासला ६-४, ६-४, ६-३ अशी सरळ तीन सेटमध्ये धूळ चारली. त्सित्सिपासने फ्रेंच स्पर्धेच्या अंतिम फेरीत जोकोव्हिचला कडवी झुंज दिली होती. परंतु त्याला विम्बल्डनमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही. तो पहिल्या फेरीत पराभूत झाला. दरम्यान, २०१९ सालच्या विम्बल्डनमध्ये देखील त्सित्सिपासला पहिल्याच सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. दुसरीकडे इंग्लंडचा अँडी मरे याने जॉर्जियाचा खेळाडू निकोलोजचा एकतर्फा पराभव करत दुसऱ्या फेरीत पोहोचला.
सबालेंका दुसऱ्या फेरीत
महिला क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या सबालेंकाने मोनिका निकोलेस्क्यूवर ६-१, ६-४ अशी मात करून दुसरी फेरी गाठली. स्पेनच्या ११व्या मानांकित गार्बिन मुगुरुझाने फिओना फेरोवर ६-०, ६-१ असे वर्चस्व गाजवले. ऑस्ट्रेलियाच्या चौथ्या मानांकित सोफिआ केनिनने वँग झिनयूवर ६-४, ६-२ अशी सरशी साधली.
जोकोव्हिचची विजयी सलामी -
जगातील अव्वल क्रमांकाचा टेनिसपटू नोवाक जोकोव्हिच याने विम्बल्डन स्पर्धेत विजयी शुभारंभ केला आहे. त्याने पहिल्या फेरीत इंग्लंडच्या जॅक ड्रापर याचा ४-६, ६-१, ६-२, ६-२ अशा फरकाने पराभव करत दुसऱ्या फेरीत धडक मारली.
हेही वाचा - मोठी बातमी, नदालची विम्बल्डन आणि टोकियो ऑलिम्पिकमधून माघार
हेही वाचा - भारतीय महिला क्रिकेटपटू अंशुला राव उत्तेजक चाचणीत दोषी, ४ वर्षांची बंदी