लंडन - यंदाच्या विम्बल्डन स्पर्धेमध्ये महिला गटात अनेक उलटफेर निकाल पाहायला मिळाले. यामध्ये अॅश्ले बार्टी आणि व्हीनस विल्यम्सचा पराभव यासारखी अनेक उदाहरणे देता येतात. आता ही स्पर्धा अंतिम टप्प्यात येऊन ठेपली आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना अमेरिकेच्या सेरेना विल्यम्स आणि रोमानियाच्या सिमोना हॅलेप यांच्यात होणार आहे.
जागतिक्र क्रमवारीत एकेकाळी अग्रक्रमांकावर असलेल्या सेरेना विल्यम्सने उपांत्य सामन्यात चेक प्रजासत्ताकाची बार्बरा स्ट्रीकोवा हिचा पराभव केला. तर दुसऱ्या गटात हॅलेपने युक्रेनच्या एलिना स्वितोलिना हिचा पराभव करत अंतिम फेरी गाठली.
विम्बल्डन स्पर्धेच्या अंतिम फेरीत, ११ व्या वेळा प्रवेश मिळवण्यासाठी सेरेना विल्यम्सला ५९ मिनिटे लागली. तिने स्ट्रीकोवाचा ६-१, ६-२ अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. हालेप प्रथमच विम्बल्डन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे. दरम्यान, हालेपने एक ग्रॅन्डस्लॅम मागील वर्षी फ्रेंच ओपनच्या रुपाने जिंकला आहे.
हॅलेपने स्वितोलिना हिचा ६-१, ६-३ असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. हा सामना १ तास १३ मिनिटे चालला.