न्यूयॉर्क - भारताचा युवा टेनिसपटू सुमित नागल याने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात प्रेक्षकांची मने जिंकली. पदार्पणात त्याचा सामना दिग्गज रॉजर फेडररविरुद्ध झाला. या सामन्यात त्याने फेडररला विजयासाठी चांगलेच झुंजवले. सुमितने पहिला सेटमध्ये धमाकेदार खेळी करत फेडररला ६-४ असे पराभूत केले. पण त्यानंतर फेडररने आपला अनुभव पणाला लावत सामना ४-६, ६-१, ६-२, ६-४ असा जिंकला. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या रॉजर फेडररने जरी सामना जिंकला तरीपण या सामन्यात सुमितच्या लढाऊवृत्तीची चर्चा जास्त झाली.
युवा टेनिसपटू सुमित नागल हा जागतिक क्रमवारीत १९० व्या स्थानी आहे. तो कारकिर्दीत प्रथमच वरिष्ठ स्तरावरील ग्रँण्डस्लॅम स्पर्धेत सहभागी झाला होता. त्याने पाच वेळा अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकणाऱ्या फेडररला पहिल्याच सेटमध्ये पराभूत करुन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.
सुमितने अमेरिकन ओपनच्या पहिल्याच सामन्यातील पहिला सेट ६-४ असा जिंकत उलटफेर करण्याचे संकेत दिले. पण, त्यानंतर अनुभवी फेडररने सलग दोन सेट ६-१, ६-२ असे घेत सामन्यात आघाडी घेतली. चौथ्या सेटमध्ये मात्र सुमितने फेडररला झुंजवले. मात्र, फेडररने अनुभवाच्या जोरावर हा सेट ६-४ असा जिंकत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. मात्र या विजयानंतर फेडररने भारताच्या युवा खेळाडूच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.