मेलबर्न - हंगामाची पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा ऑस्ट्रेलियन ओपनच्या प्रत्येक दिवशी ३०,००० प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेशाची परवानगी असणार आहे. व्हिक्टोरियाचे क्रीडामंत्री मार्टिन पाकुला यांनी ही माहिती दिली. यंदाची ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा ८ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारीदरम्यान चालणार आहे. तथापि, स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीसाठी आणि उर्वरित सामन्यांसाठी केवळ २५,००० प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्याची परवानगी देण्यात आली आहे.
हेही वाचा - मिस्टर क्रिकेटने 'या' खेळाडूला म्हटले भारताचे भविष्य
पाकुला म्हणाले, "येत्या १४ दिवसांत एकूण ३,९०,००० प्रेक्षक मेलबर्न पार्कमध्ये असतील. रॉड लॅव्हर एरेनामध्ये अविश्वसनीय वातावरण असेल." ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये भाग घेण्यासाठी आलेले टेनिसपटू मेलबर्न आणि अॅडलेड येथे उपस्थित आहेत. या सर्वांनी १४ दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण केला आहे.
सराव सामन्यात सेरेना-जोकोविच विजयी -
२३ वेळा ग्रँडस्लॅम चॅम्पियन सेरेना विल्यम्सने ऑस्ट्रेलियन ओपनपूर्वी शुक्रवारी प्रदर्शनीय सामना खेळला. या सामन्यात तिने जपानच्या नाओमी ओसाकाला ६-२, २-६, १०-७ असे पराभूत केले. हा सामना हा सामना प्रेक्षकांच्या उपस्थितीत खेळला गेला. याव्यतिरिक्त पुरुष एकेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने फिलिप क्राझिनोविकला ६-३, ६-३ असे पराभूत केले.