बेलग्रेड - सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने यंदाच्या यूएस ओपनमध्ये खेळणार असल्याचे स्पष्ट केले आहे. कोरोनाव्हायरसनंतरच्या ब्रेकनंतर ही पहिली ग्रँड स्लॅम स्पर्धा असणार असेल. "मी सिनसिनाटी टेनिस आणि यूएस ओपनमध्ये भाग घेत आहे'',असे जोकोविचने ट्विटरवर सांगितले.
जोकोविच पुढे म्हणाला, ''आव्हाने व अडथळे पाहता हा निर्णय घेणे तितके सोपे नव्हते. परंतु, पुन्हा स्पर्धा करण्याच्या विचाराने मी उत्साही झालो आहे." यूएस ओपनची सुरुवात ३१ ऑगस्टपासून होईल. ही स्पर्धा प्रेक्षकांशिवाय खेळली जाईल.
या स्पर्धेतून स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदाल, निक किर्गिओस, आणि महिला खेळाडू एश्ले बार्टी यांनी कोरोनामुळे माघार घेतली आहे. मागील वर्षी ही स्पर्धा जिंकलेली कॅनडाची अँड्रेस्क्यु बियांकाही या स्पर्धेत खेळणार नाही. स्वित्झर्लंडचा महान खेळाडू रॉजर फेडरर गुडघ्याच्या शस्त्रक्रियेमुळे या स्पर्धेत गैरहजर असेल. यूएस ओपनपूर्वी, २२ ऑगस्टपासून सिनसिनाटी ओपन होणार आहे.
कोरोनाव्हायरसमुळे यंदाच्या यूएस ओपन टेनिस स्पर्धेची बक्षीसाची रक्कम कमी करण्यात आली आहे. ३१ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेची बक्षीस रक्कम मागील वर्षाच्या तुलनेत ८.५० लाख डॉलर्स (अंदाजे ६ कोटी ३६ लाख रुपये) कमी करण्यात आली आहे, असे यूएस टेनिस असोसिएशनने (यूएसटीए) सांगितले.