क्लीवलँड - भारतीय महिला स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने तिची अमेरिकी पार्टनर ख्रिस्टिना मेकल हिच्यासोबत खेळताना टेनिस इन द लँड या स्पर्धेत अंतिम फेरी गाठली आहे. ही स्पर्धा क्लीवलँड येथे होत असून उपांत्य फेरीत मिर्झा-मेकल जोडीने जोरदार खेळ केला. दरम्यान, या स्पर्धेला क्लीवलँड चॅम्पियनशीप नावाने देखील ओळखले जाते.
सानिया मिर्झाला टोकियो ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही. ती विशेष रॅकिंगच्या आधारावर टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली होती. तिने भारतीय अंकिता रैना सोबत महिला दुहेरीमध्ये जोडी जमवली. पण त्यांना पहिल्या फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. यानंतर सानिया मिर्झाला ट्रोल करण्यात आले. आता ती हळूहळू आपल्या फॉर्मात येत असल्याचे संकेत दिले आहेत.
सानिया मिर्झाने ख्रिस्टिना मेकलसोबत जोडी जमवली आहे. या जोडीने टेनिस इन द लँड या स्पर्धेत भाग घेतला आणि अंतिम फेरी गाठली. उपांत्य सामन्यात सानिया-मेकल जोडीने नार्वेच्या उल्रिक्के इकेरी आणि अमेरिकेच्या कॅथरिम हॅरीसन या जोडीचा पराभव केला. सानिया-मेकल जोडीने एक तास 23 मिनिटे रंगला हा सामना 7-5, 6-2 अशा फरकाने जिंकत अंतिम फेरीत धडक दिली.
सानिया-ख्रिस्टिना जोडीचा अंतिम फेरीत सामना, जपानच्या शुको आयोमा आणि इना शिबाहारा या जोडीशी होणार आहे. सानिया- ख्रिस्टिना जोडीने या स्पर्धेत जोरदार खेळ केला आहे. मागील दोन सामन्यात या जोडीने एकही सेट न गमावता विजय मिळवला आहे.
सानिया-ख्रिस्टिना जोडीने उपांत्यपूर्व फेरीत चेक गणराज्यच्या लूसी राडेस्का आणि चीनच्या शुआइ झांग या जोडीचा 6-3, 6-3 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला होता. या सामन्यात त्यांनी नऊ ब्रेक पाँईटमधील 5 जिंकत सहज विजय मिळवला होता. त्याआधी पहिल्या फेरीत त्यांनी जॉर्जियाच्या ओकसाना कालाश्विकोवा आणि रोमानियाच्या आंद्रिया मितू यांना 6-3, 6-2 ने नमवले होते.
हेही वाचा - टोकियो पॅरालिम्पिक 2020 : पहिल्यांदाच भारताची टेबल टेनिस खेळाडू उपांत्यफेरीत; भाविना पटेलची कामगिरी
हेही वाचा - IND vs ENG 3rd test : भारताचे जोरदार प्रत्युत्तर, पुजाराची संयमी खेळी