मेलबर्न - ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी भारताच्या पदरी निराशा पडली. पुरुष दुहेरीत झालेल्या अटीतटीच्या सामन्यात भारताचा रोहन बोपण्णा आणि जपानच्या बेन मॅकलॅचलन या जोडीला पराभवाचा सामना करावा लागला.
कोरियाच्या जी सुंग नाई आणि मिनी-क्यू साँग या जोडीने बोपण्णा-मॅकलॅचलनला ६-४, ७-६ (०) असे पराभूत केले. हा सामना एक तास १७ मिनिटे रंगला होता. बोपण्णाने सलामीच्या सेटमध्ये सर्व्हिस गमावली. कोरियाच्या खेळाडूंनी आपली योजना चोख आखत पहिला सेट नावावर केला.
हेही वाचा - ''विकेटकीपिंगच्या बाबतीत पंत पाळण्यातल्या मुलासारखा'', दिग्गज क्रिकेटपटूने दिले मत
दुसऱ्या सेटमध्येही बोपण्णा-मॅकलॅचलनची जोडी कोरियाच्या खेळाडूंविरुद्ध संघर्ष करताना दिसली. मात्र, या सेटमध्येही बोपण्णा-मॅकलॅचलनला पराभवाची चव चाखावी लागली. रोहन बोपण्णाला ऑस्ट्रेलियन ओपनच्या तयारीसाठी पूर्ण वेळ मिळू शकला नाही. मेलबर्न गाठल्यानंतर, त्याला १४ दिवस क्वारंटाइनमध्ये राहावे लागले होते. ३० जानेवारीला तो क्वारंटाइनमधून बाहेर आला.