लंडन - स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू, २० ग्रॅण्डस्लॅमचा मानकरी रॉजर फेडरर याच्या गुडघ्याच्या जखमेवर शस्त्रक्रिया झाली आहे. तो २०२० या वर्षामधील एकही स्पर्धा खेळू शकणार नाही. तो पुढच्या वर्षी म्हणजे २०२१ मध्ये कोर्टवर पुन्हा उतरण्याची शक्यता आहे.
३८ वर्षांच्या फेडररने ट्विटवरून माहिती दिली. तो म्हणाला, '२०२० या वर्षात मी कोर्टवर उतरु शकणार नाही. कारण गुडघ्याच्या दुखापतीने मी त्रस्त आहे.' फेब्रुवारीत फेडररच्या उजव्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया पार पडली. ती अयशस्वी ठरल्याने आता पुन्हा शस्त्रक्रिया करून घ्यावी लागली. यामुळे २०२१ च्या सुरुवातीला मैदानावर परतण्याचा फेडररने निर्णय घेतला आहे.
दरम्यान, फेडररने माहिती दिल्यानंतर त्याच्या निवृत्तीची चर्चा सुरू झाली. फेडररचे वय पाहता, २०२१ मध्ये त्याला कोर्टवर पुनरागमन करण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतील, असे तज्ज्ञांचे मत आहे. फेडररने अखेरची स्पर्धा २०१८ मध्ये ऑस्ट्रेलिया ओपन जिंकली होती. तो पुरूष एकेरीमधून सर्वाधिक २० ग्रँडस्लॅम जिंकणारा खेळाडू आहे. यानंतर राफेल नदाल (१९) आणि नोव्हाक जोकोव्हिच (१७) यांचा नंबर लागतो.
हेही वाचा - कोरोना संकट : भारतापाठोपाठ सानियाने पाकिस्तानलाही केली मदत
हेही वाचा - कमाईच्या बाबतीत ओसाकाची सेरेना विल्यम्सवर मात