ओस्ट्रावा (चेक गणराज्य): भारताची स्टार महिला टेनिसपटू सानिया मिर्झा हिने या हंगामात आपल्या पहिल्या विजेतपदावर मोहोर उमटवली आहे. सानियाने ओस्ट्रावा ओपन स्पर्धेच्या महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले. सानियाने चीनी जोडीदार शुआई झांग हिच्यासोबत मिळून खेळताना हे विजेतेपद आपल्या नावे केले. सानिया-झांग जोडीने अमेरिकेच्या कॅटलिन ख्रिश्चियन आणि न्यूझीलंडची एरिन रोटफिल या जोडीचा 1 तास आणि 4 मिनिटे रंगलेल्या सामन्यात 6-3, 6-2 ने पराभव केला.
सानिया मिर्झा मागील महिन्यात तिची अमेरिकेची जोडीदार ख्रिस्टिना माचेल सोबत डब्ल्यूटीए 250 क्वीवलँड स्पर्धेत अंतिम फेरी गाठली होती. पण त्यांना अंतिम सामन्यात पराभव पत्कारावा लागला होता. ओस्ट्रावा ओपनमध्ये या पराभवाची कसर सानिया मिर्झाने भरून काढली. तिने या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
20 महिन्यानंतर पटकावले विजेतेपद
34 वर्षीय सानिया मिर्झाने 20 महिन्यांपूर्वी डब्ल्यूटीए विजेतेपद जिंकले होते. तिने जानेवारी 2020 मध्ये होबार्ट इंटरनॅशनल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. यानंतर तिने 20 महिन्यानंतर आणखी एक विजेतेपद आपल्या नावे केले. या विजेतेपदासह सानियाचा डबल्स टायटल्सचा आकडा 43 वर पोहोचला आहे.
सानिया आणि झांग या जोडीने ओस्ट्रावा ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इरी होजुमी आणि माकोतो निनोमिया या जपानच्या चौथ्या मानांकित जोडीचा 6-2, 7-5 अशा फरकाने पराभव केला होता.
रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात सानिया-झांग जोडीने चांगली सुरूवात केली. दोघांनी पहिल्या सेटमध्ये जोरदार खेळ केला. यामुळे विरोधी जोडी बॅकफूटवर गेली. सहाव्या गेममधील एका ब्रेक पाँईंटमध्ये भारत-चीन जोडीने 4-2 अशी आघाडी घेतली आणि हा सेट एकतर्फा जिंकला.
दुसऱ्या सेटमध्ये तिसऱ्या मानांकित ख्रिश्चियन-रोटफिल जोडीने सावध खेळ केला. परंतु सानिया-झांग जोडीच्या अनुभवासमोर ख्रिश्चियन-रोटफिल जोडीचा निभाव लागला नाही. भारत-चिनी जोडीने विरोधी जोडीची तिसरी आणि सातवी सर्विस भेदली.
हेही वाचा - IPL 2021 : केकेआर खरेचं कौतुकास पात्र आहे - महेंद्रसिंग धोनी
हेही वाचा - SRH vs RR : प्ले ऑफ शर्यतीत राहण्यासाठी राजस्थानला विजय आवश्यक; समोर हैदराबादचे आव्हान