पॅरिस - सोमवारी जाहीर झालेल्या एटीपीच्या ताज्या क्रमवारीत सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने आपले पहिले स्थान कायम राखले आहे. जोकोविच दुसऱ्या क्रमांकावरील नदालपेक्षा १८९० गुणांनी पुढे आहे. जोकोविचचे सध्या ११, ७४० तर नदालचे ९८५० गुण आहेत. या क्रमवारीत डॉमिनिक थीम तिसर्या तर स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर चौथ्या स्थानावर आहे. ग्रीसच्या स्टीफानो सितसिपासने पाचवे स्थान राखले आहे.
लाल मातीच्या कोर्टवरील आपली एकाधिकारशाही स्पेनच्या राफेल नदालने फ्रेच ओपनमध्ये पुन्हा दाखवून दिली. त्याने सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचला तीन सेटमध्ये पराभूत करत यंदाच्या फ्रेंच ओपन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. नदालचे हे ऐतिहासिक १३वे फ्रेंच ओपन विजेतेपद ठरले. या विजेतेपदासह नदालने रॉजर फेडररच्या पुरुष एकेरीतील विक्रमी २० ग्रँडस्लॅम विजेतेपदांची बरोबरीसुद्धा साधली.
महिलांच्या रँकिंगमध्ये फ्रेंच ओपनचा किताब जिंकणारी पोलंडची युवा खेळाडू इगा स्वितेक ३७ स्थानांची झेप घेत १७व्या स्थानावर पोहोचली आहे. तर, प्रथम स्थान ऑस्ट्रेलियाच्या अॅश्ले बार्टीने कायम राखले आहे. दुसर्या स्थानावर रोमानियाची सिमोना हालेप, तिसऱ्या स्थानावर नाओमी ओसाका, चौथ्या क्रमांकावर फ्रेंच ओपनचा उपविजेती सोफिया केनिन आहे. अमेरिकेची सेरेना विल्यम्स दहाव्या क्रमांकावर पोहोचली आहे.