रोम - जगातील प्रथम क्रमांकाचा पुरुष टेनिसपटू सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने इटालियन ओपनच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. जोकोविचने जर्मनीच्या डॉमिनिक कोएफरला ६-३, ४-६, ६-३ असे हरवले. हा सामना दोन तासांपेक्षा जास्त वेळ रंगला होता.
सामन्यादरम्यान जोकोविचचा राग पुन्हा दिसला. सर्व्हिस गेम गमावल्यानंतर त्याने रॅकेटला ग्राउंडवर आपटले. दोन आठवड्यांपूर्वी, यूएस ओपनमध्ये जोकोविचने रागाच्या भरात लाइन पंचाना एक चेंडू मारला होता. त्यामुळे त्याला यूएस ओपनमधून बाद करण्यात आले होते.
जोकोविच म्हणाला, "माझ्या कारकिर्दीतील ही पहिली किंवा शेवटची वेळ नाही, जेव्हा मी रॅकेट तोडले आहे. कधीकधी मी माझा राग अशा प्रकारे बाहेर काढतो. मी त्याच प्रकारे माझ्या मानसिक आणि भावनिक आरोग्यावर कार्य करत आहे.'' पुढच्या फेरीत जोकोविचचा सामना नॉर्वेच्या कॅस्पर रुडशी होईल.
तर, क्ले कोर्टचा बादशहा, अशी ओळख असलेला स्पेनचा राफेल नदाल या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. उपांत्यपूर्व फेरीत अर्जेंटिनाच्या दिएगो श्वार्ट्झमनने नदालचा ४-६, ६-३, ७-६ (७-५) अशा सरळ सेटमध्ये पराभव केला.