नवी दिल्ली - भारताचा महान टेनिस खेळाडू लिएंडर पेस आणि न्यूझीलंडच्या मार्कस डॅनियल या जोडीने हॉल ऑफ फेम टेनिस ओपनच्या उपांत्य सामन्यात धडक मारली आहे. पुरुष दुहेरीमध्ये त्यांनी मॅथ्यू एब्डन आणि रॉबर्ट लिंडेस्टेड यांना 6-4, 5-7, 14-12 अशी मात दिली.
46 वर्षीय पेस 2006 नंतर एटीपीच्या उपांत्य सामन्यात पोहोचणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. त्याने अमेरिकेचे दिग्गज खेळाडू जॉन मॅक्नेरो यांना मागे टाकले. 18 ग्रँडस्लम जिंकणारा पेस हा दुहेरीत सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्यांमध्ये सहावा खेळाडू ठरला आहे.
पेस म्हणाला, '10-15 वर्षांपूर्वी मी जेवढी मेहनत करत होतो, आता त्यापेक्षा दुप्पट मेहनत मला आता करावी लागते. हे फक्त वय आहे, पण मला माझे काम आवडते. मी तरुण असताना पाच-सहा तास सराव करताना खूप मेहनत घ्यायचो'. उपांत्य सामन्यात पेस आणि मार्कस सर्जिया स्खाहोव्स्कीशी लढतील.