न्यूयॉर्क - यूएस ओपनची गतविजेती नाओमी ओसाकाने कोको गॅाफचा पराभव करत पुढच्या फेरीत प्रवेश केला. ओसाकाने पंधरा वर्षीय कोको गॅाफचा ६-३, ६-० असा सरळ सेटमध्ये पराभव केला. पराभवानंतर गॅाफ कोर्टवरच रडू लागली.
प्रतिस्पर्धी ओसाकाने गॅाफचे सांत्वन केले. 'गॅाफ खूपच कमी वयाची आहे. लहान वयातच यूएस ओपनसारख्या स्पर्धेत खेळने खूप मोठी गोष्ट आहे. तिने रडत न जाता स्वत:चा अभिमान बाळगत कोर्टच्या बाहेर जावे, अशी माझी इच्छा आहे,' असे मत ओसाकाने व्यक्त केले. पंधरा वर्षीय कोको गॅाफ ही यूएस ओपनच्या तिसऱ्या फेरीत पोहचणारी सर्वांत युवा महिला खेळाडू आहे.
हेही वाचा - लागोपाठ सहा वेळा शून्यावर राहिला, आणि लाजीरवाणा विक्रम नावावर केला
सेरेना विल्यम्स आणि नोवाक जोकोविच या दिग्गज खेळाडूंनी देखील गॅाफचे कौतुक केले. सेरेनाने गॅाफला 'महिला टेनिसचे भविष्य' म्हटले तर जोकोविचने तिला 'नवीन सुपरस्टार' संबोधले.