मेलबर्न - अमेरिकेची दिग्गज टेनिसपटू सेरेना विल्यम्सने वर्षाची पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. सेरेनाने उपांत्यपूर्व सामन्यात जागतिक क्रमवारीत दुसर्या क्रमांकाची खेळाडू रोमानियाच्या सिमोना हालेपचा पराभव केला. २३ वेळा ग्रँडस्लॅम विजेत्या सेरेनाला आता उपांत्य फेरीच्या सामन्यात जपानच्या नाओमी ओसाकाचे आव्हान असेल.
हेही वाचा - जसप्रीत बुमराहला विश्रांती मिळण्याची शक्यता
एक तास २१ मिनिटे रंगलेल्या सामन्यात सेरेनाने हालेपला ६-३, ६-३ असे सरळ सेटमध्ये हरवले. २०१७मध्ये सेरेनाने शेवटचे या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. आपल्या विक्रमी २४ ग्रँडस्लॅम विजेतेपदापासून सेरेना दोन पावले दूर आहे. ऑस्ट्रेलियन ओपनमधील सातवेळा विजेत्या सेरेनाने २०१७ नंतर प्रथमच स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
दुसरीकडे, महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत तिसर्या मानांकित ओसाकाने चिनी तैपेईच्या सु वेई सुसीला ६-२, ६-२ असे पराभूत करून उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली आहे. तर, पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात रशियाच्या एस्लान आपली विजयी मोहीम सुरू ठेवत १८व्या मानांकित बल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोव्हला २-६, ६-४, ६-१, ६-२ असे पराभूत करत उपांत्य फेरी गाठली.