मेलबर्न - भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याची युक्रेनची जोडीदार नादिया किचनोक यांचे ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत बोपण्णा-नादिया जोडीचा झेक प्रजासत्ताकच्या बारबोरा क्रेसिकोवा आणि क्रोएशियाच्या निकोला मेकटिकने ६-०, ६-२ अशी सरळ सेटमध्ये मात दिली.
जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असलेल्या बारबोरा-निकोला जोडीने बोपण्णा-नादिया जोडीचा अवघ्या ४७ मिनिटात पराभव केला. पहिल्या गेमपासून क्रोएशिया आणि झेक प्रजासत्ताकच्या जोडीने वर्चस्व राखले आणि एकही गेम न गमावता पहिला सेट ६-० ने जिंकला.
दुसर्या सेटमध्ये बोपण्णा आणि किचनोकने पहिल्या गेममध्ये आपली सर्व्हिस वाचवली पण त्यानंतर या जोडीने दोनदा सर्व्हिस गमावली, परिणामी मेकटिक आणि बारबोराच्या जोडीने उपांत्य फेरी गाठली. बोपण्णाच्या या पराभवासह ऑस्ट्रेलियन ओपनमधील भारताचे आव्हान आता संपुष्टात आले आहे.