दुबई - भारत आणि नामिबिया यांच्यात दुबईत खेळविण्यात आलेला टी-२० विश्वचषकाच्या सुपर-१२ टप्प्यातील अंतिम सामना भारताने नऊ विकेटने जिंकून स्पर्धेचा विजयी समारोप केला. भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडल्याने हा सामना जिंकून शेवट गोड करण्याचा प्रयत्न टीम इंडियाचा होता. विशेष म्हणजे कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळला गेलेला हा अंतिम टी-20 सामना होता. या सामन्यात रोहित शर्मा व के. एल राहुलने अर्धशतक ठोकून सामना जिंकला. सामनावीरचा पुरस्कार रविंद्र जडेजाला देण्यात आला.
133 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या टीम इंडियांच्या डावाची सुरुवात रोहित शर्मा आणि केएल राहुल या सलामीवीरांनी केली. रुबेन ट्रम्पेलमनने नामिबियासाठी पहिले षटक टाकले. दोघांनी चौफेर फटकेबाजी करत पहिल्या तीन षटकार भारताची धावसंख्या बिनबाद २६ धावांवर पोहोचवली. रोहितने आक्रमक पवित्रा धारण करत पाचव्या षटकात ११ धावा कुटल्या. ५ षटकात भारताने बिनबाद ४४ धावा केल्या. पॉवरप्लेच्या ६ षटकात भारताने बिनबाद ५४ धावा केल्या. आठव्या षटकात रोहितने अर्धशतक पूर्ण केले. हे रोहितचे २४वे आंतरराष्ट्रीय टी-२० अर्धशतक ठरले. आठ षटकात भारताने बिनबाद ७० धावा केल्या.
१२व्या षटकात भारताने शतक पूर्ण केले. १२ षटकात भारताने १ बाद १०५ धावा केल्या.१०व्या षटकात नामिबियाचा वेगवान गोलंदाज जॅन फ्रायलिंकने रोहितला बाद केले. रोहितने ७ चौकार आणि २ षटकारांसह ५६ धावा केल्या. १० षटकात भारताने १ बाद ८७ धावा केल्या. रोहितनंतर सूर्यकुमार यादव मैदानात आला. के. एल राहुलने 36 चेंडूत 54 धावा केल्या यामध्ये 2 षटकार व 4 चौकारांचा समावेश आहे. सुर्यकुमार यादवने 19 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने नाबाद 25 धावा केल्या.
नामिबियाचा डाव -
नामिबियाचे सलामीवीर स्टीफन बार्ड आणि मायकेल व्हॅन लिंजेन यांनी ३३ धावांची सलामी दिली. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने पाचव्या षटकात लिंजेनला (१४) झेलबाद केले. त्यानंतर आलेल्या क्रेग विल्यम्सला पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात रवींद्र जडेजाने फिरकीत अडकवले. आठव्या षटकात जडेजाने सलामीवीर बार्डला पायचीत पकडले. बार्डने २१ धावा केल्या. यानंतर ठराविक अंतराने जडेजा-अश्विनने नामिबियाला धक्के दिले. अनुभवी फलंदाज डेव्हिड वीजाने २६ धावांचे योगदानन दिल्यामुळे नामिबियाला शतकी पल्ला ओलांडता आला. नामिबियाने २० षटकात ८ बाद १३२ धावा केल्या. भारताकडून जडेजा आणि अश्विन यांनी प्रत्येकी ३ तर बुमराहने २ बळी घेतले.