नवी दिल्ली - भारतीय कुस्ती महासंघाकडून (WFI) सोमवारी वेगवेगळ्या प्रतिष्ठीत पुरस्कारांसाठी काही कुस्तीपटूंची शिफारस केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडे करण्यात आली आहे. यामध्ये मराठमोळ्या राहुल आवारेची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आलीय. राहुलसोबत महासंघाने हरप्रीत सिंग, दिव्या काकरान आणि पूजा धांडा यांचीही शिफारस अर्जुन पुरस्कारासाठी केली आहे.
दिग्गज भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांची प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. बजरंग ६५ किलो वजनी गटात जगातला पहिल्या क्रमांकाचा खेळाडू असून हल्लीच त्याने आशियाई अजिंक्यपद कुस्ती, राष्ट्रकुल क्रीडा आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. तर विनेश आशियाई क्रीडा स्पर्धेत आणि राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू बनली होती.
दुसरीकडे द्रोणाचार्य पुरस्कारासाठी वीरेंद्र कुमार, सुजीत मान, नरेंद्र कुमार आणि विक्रम कुमार यांची तर भीम सिंग आणि जय प्रकाश यांची ध्यानचंद पुरस्कारासाठी भारतीय कुस्ती महासंघाकडून शिफारस करण्यात आलीय. यापूर्वी अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (AIFF) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (BCCI) अर्जुन पुरस्कारासाठी आपआपल्या खेळाडूंच्या नावांची शिफारस केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडे करण्यात आली आहे.