नवी दिल्ली - कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातले असून क्रीडाविश्वातही या व्हायरसने शिरकाव केला आहे. ऑलिम्पिकसह अनेक महत्वाच्या स्पर्धा पुढे ढकलल्या गेल्यामुळे अनेक खेळाडू चिंतेत आहेत. दरम्यान, निवृत्तीच्या वेशीवर असणारा भारताचा अनुभवी कुस्तीपटू सुशील कुमारने आगामी ऑलिम्पिकसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.
सुशील पुढच्या महिन्यात 37 वर्षांचा होईल. लोकांना माझी कारकीर्द कशी संपेल याविषयी लिहिण्याची सवय आहे. पण मला काही फरक पडत नाही, असे सुशीलने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. सुशीलने ऑलिम्पिकसाठी पात्र होण्यासाठी संघर्ष केला आहे. पण ही स्पर्धा पुढे गेल्यानंतर पुन्हा एकदा त्याला पदक जिंकण्याची आशा वाटते.
सुशीलने निवृत्तीचा निर्णय नाकारला असून त्याने दररोज सराव करत असल्याचे सांगितले आहे. तो म्हणाला, "मी आता कुठेही जात नाही. माझ्याकडे अधिक वेळ आहे. चांगली तयारी करण्यासाठी हा वेळ आहे. मी आता दररोज दोनदा सराव करतो. मी स्वत: ला तंदुरुस्त ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. जर देव इच्छित असेल तर मी ऑलिम्पिकसाठी निश्चितपणे पात्र होईन.''