नवी दिल्ली - जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य पदक जिंकणारा कुस्तीपटू राहुल आवारे याला कोरोनाची लागण झाली आहे. राष्ट्रीय शिबिरासाठी सोनीपत येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणात (साई) दाखल झाल्यानंतर त्याला कोरोना झाल्याचे समोर आले आहे. याआधी विनेश फोगाट, दीपक पुनिया, नवीन आणि कृष्णन या कुस्तीपटूंनाही कोरोनाची लागण झालेली आहे.
या संदर्भात साईने एक पत्रक प्रसिध्द केले आहे. यात त्यांनी म्हटलं की, राहुल आवारेची चाचणी करण्यात आली. यात तो पॉझिटिव्ह आढळला. आवारेला साईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या प्रकृतीवर साईचे डॉक्टर लक्ष ठेवून आहेत. शिबिरासाठी दाखल झाल्यापासून तो विलगीकरणात असून तो अन्य कोणत्याही खेळाडूच्या संपर्कात आलेला नाही.
आवारेने मागील वर्षी नूर सुल्तान येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत ६१ किलो गटातून कास्यं पदक जिंकले होते. दरम्यान, दीपक पुनियाला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. त्याला त्याच्या घरी क्वारंटाइन होण्यास सांगितलं आहे. विनेश सुद्धा या आजारातून सावरली आहे. तिची पुन्हा दोन वेळा चाचणी करण्यात आली. यात तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. पण खबरदारी म्हणून तिला तिच्या घरी क्वारंटाइन राहण्याची ताकिद देण्यात आली आहे.
हेही वाचा - कौतुकास्पद...! रोहित पवार युवा कुस्तीपटू सोनालीच्या मदतीला धावले
हेही वाचा - खेलरत्न पुरस्काराचे नाव बदला, राजीव गांधींचे नाव हटविण्याची फोगटची मागणी