नवी दिल्ली - महिलांच्या 400 मीटर शर्यतीतील जगज्जेती धावपटू सलवा ईद नासरला स्वत:ला डोपिंग चाचणीसाठी उपलब्ध न केल्याबद्दल निलंबित करण्यात आले. बहारिनच्या नासरवर शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली. नासरवरील निलंबन तात्पुरत्या स्वरूपाचे असणार आहे.
नासरने नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई केली गेली असल्याचे अॅथलेटिक्स इंटिग्रिटी युनिटने सांगितले आहे. जर हे प्रकरण सिद्ध झाले तर नासर पुढच्या वर्षीच्या ऑलिम्पिकमध्ये भाग घेऊ शकणार नाही.
महत्त्वाचे म्हणजे, नासरने ऑक्टोबरमध्ये 48.14 सेकंदासह जागतिक जेतेपद जिंकले होते. 1985 नंतर अशी वेळ नोंदवणारी नासर ही पहिली महिली धावपटू आहे.
किरणजीत कौरवर चार वर्षाची बंदी -
गेल्या वर्षीची टाटा स्टील कोलकाता 25केची विजेती आणि लांब पल्ल्याची धावपटू किरणजीत कौरवर चार वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. डोपिंग प्रकरणी वर्ल्ड अॅथलेटिक्स डोपिंग एजन्सीने (वाडा) ही बंदी घातली आहे. नॅशनल डोप इन्व्हेस्टिगेशन लॅबोरेटरीला वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सीने निलंबित केले आहे. या कारणास्तव कौरचे नमुने दोहा येथील वाडाच्या अधिकृत प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. टाटा स्टील कोलकाता 25केचा पुरस्कारही कौरकडून काढून घेतला जाईल.