नवी दिल्ली - जागतिक उत्तेजक द्रव प्रतिबंधक संस्थेने (वाडा) रशियावर चार वर्षांसाठी बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या बंदीमुळे रशिया हा देश आता पुढील चार वर्षांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व प्रकारच्या खेळांतून बाद झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे पुढील वर्षात टोकियोमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक २०२०मध्ये आणि २०२२ च्या फुटबॉल विश्वकरंडकामध्ये रशियातील खेळाडूंना खेळता येणार नाही.
डोपिंगबाबत चुकीचा तपशील पुरवल्याने रशियावर ही बंदी घालण्यात आली आहे. याबाबत वाडाच्या प्रवक्त्याने तपशीलवार माहिती दिली आहे. वाडाच्या कार्यकारी समितीची बैठक स्वित्झर्लंड मध्ये पार पडली. एका लॅबमधून डोपिंगबाबत योग्य अहवाल न दिल्याने ४ वर्षांच्या बंदीचा कठोर निर्णय एकमताने घेण्यात आल्याचे 'वाडा'ने सांगितले.
रशियाच्या खेळाडूंबाबत डोपिंगची अनेक प्रकरणे उघडकीस आली होती, त्यानंतर त्यांच्यावर अनेक आरोपदेखील झाले. आज अखेर (सोमवार) 'वाडा'ने रशियावर चार वर्षांची ऑलिम्पिक बंदी घातली. पुढील ४ वर्ष आता रशियाचा संघ ऑलिम्पिकमध्ये किंवा कुठेही पाहायला मिळणार नाही.दरम्यान, रशियावर ही बंदी घातली असली तरी डोपिंग चाचणीत ज्या खेळाडूंना क्लिन चीट मिळेल ते खेळाडू तटस्थ झेंड्याखाली आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होऊ शकतात. त्यामुळे ज्या खेळाडूंना क्लिन चीट मिळेल त्यांना दिलासा मिळणार आहे.
रशिया वाडाच्या या निर्णयाला पुढील २१ दिवसात आव्हान देऊ शकतो. असे सांगण्यात आले. जर रशियाने आव्हान दिल्यास या प्रकरणी स्वित्झर्लंडमधील क्रीडाविषयक आंतरराष्ट्रीय लवादापुढे सुनावणी होऊ शकते. दरम्यान, वाडाचा रशियावरिल कारवाईचा निर्णय क्रीडाविश्वातील सर्वात कठोर निर्णय मानला जात आहे.