नवी दिल्ली - भारताचा महान बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदला लेजेंड स्पर्धेत सलग चौथा पराभव स्वीकारावा लागला. स्पर्धेच्या चौथ्या फेरीत त्याचा नेदरलँडच्या अनिश गिरीने पराभव केला. शुक्रवारी रात्री खेळल्या गेलेल्या या सामन्यापूर्वी या दोघांमध्ये चार सामने अनिर्णित राहिले. आनंदला या स्पर्धेचा पहिला गुण मिळाला असला तरी तो गुणतालिकेत खालीच आहे.
पहिल्या सामन्यामध्ये आनंदला 82 चालींनंतर बरोबरी पत्करावी लागली, तर दुसरा सामना 49 चालींपर्यंत झाला. तिसरा आणि चौथा सामनाही अनिर्णित राहिला. निर्णायक सामन्यात गिरीने दोन गुणांसह विजय मिळवला.
आनंदचा सामना पुढील फेरीत हंगेरीच्या पीटर लेकोशी होईल. यापूर्वी, त्याला सुरुवातीच्या दोन फेऱ्यांमध्ये पीटर स्वीडलर आणि मॅग्नस कार्लसन यांच्याकडून पराभव स्विकारावा लागला होता.
या मॅग्नस कार्लसन टूरमध्ये आनंद पहिल्यांदा खेळत आहे. दहा खेळाडूंच्या रॉबिन राऊंड लीगनंतर अव्वल चार खेळाडू उपांत्य फेरीत खेळतील. 31 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान उपांत्य फेरीचे सामने खेळले जातील. अंतिम सामना 3 ते 5 ऑगस्ट दरम्यान खेळला जाईल.